कारच्या धडकेत वृद्ध दुचाकीचालकाचा मृत्यू
Published on
:
05 Oct 2024, 7:12 am
Updated on
:
05 Oct 2024, 7:12 am
माणगाव/ धाटाव : पुढारी वृत्तसेवा
कुलदेवतेच्या घटस्थापने करिता आलेल्या रोहा तालुक्यातील धाटाव गावचे सामाजिक कार्यकर्ते भागोजी मालु खैरे यांचे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोटनेर नाक्यावर झालेल्या अपघातात निधन झाले.
3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर नजीक पोटणेर गावात रोहा तालुक्यातील धाटाव गावचे सामाजिक कार्यकर्ते भागोजी मालु खैरे (वय 67) हे आपल्या दुचाकीवरून आपल्या कुलदेवतेच्या घटस्थापने करिता एकटेच निघाले होते. मुंबई गोवा महामार्गावर पोटनेर गावानजीक आले असता रस्त्याच्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जाण्यासाठी थांबून मागून कोणी येत नसल्याची खात्री करीत इंडिकेटर देत रस्ता पार करत असताना मागून भरगाव वेगाने आलेल्या कारने खैरे यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. अपघाताच्या जोरदार आवाजाने भयभीत झालेल्या ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी त्यांच्या डोक्याला, नाकाला आणि हाता-पायाला गंभीर दुखापत झालेल्या खैरे यांना नजीकच्या इस्पितळात उपचारासाठी आणले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची प्रत्यक्षदर्शींनी माणगांव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. तर कारचा चालक आणि सहकारी यांनी घटनास्थळावरून पळ काढला असून फरार झाले आहेत.