व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी प्रकरणात आरोपींना मोक्का लावण्याचा प्रयत्न:पोलिस अधिक्षक कोकाटेंची माहिती, सहा जणांना अटक, कार, दोन पिस्टलसह 9 मोबाईल जप्त

2 hours ago 1
कांडली फाटा येथून व्यापाऱ्याच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी कर्नाटक, तेलंगणात जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न करणाऱ्या सहा अट्टल गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून एक कार, दोन पिस्टल व ९ मोबाईल जप्त केले असून त्यांना मोक्का लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. येथील पोलिस अधिक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, विष्णूुकांत गुट्टे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, राजेश मलपिल्लू यांची उपस्थिती होती. आडा येथील व्यापारी गणपतराव शिंदे यांचे खंडणीसाठी अपहरण झाल्याचे लक्षात आल्यानंतर सात पथके तयार केली. या पथकाकडून राष्ट्रीय महामार्गावरील सर्व कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, त्यानंतर मोठ्या शहरात जाणारे व शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर काही संशयीत वाहने दिसली. त्यानंतर किमान ३०० पेक्षा अधिक मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर संशयीतांची नांवे समोर आली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक घेवारे, राजेश मलपिल्लू, उपनिरीक्षक कपील आगलावे, विक्रम विठूबोने, राजू ठाकूर, आझम प्यारेवाले, किशोर सावंत, नितीन गोरे, दत्ता नागरे, आकाश टापरे, विशाल खंडागळे, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, इरफान पठाण, प्रदीप झुंगरे यांची पथके छत्रपती संभाजीनगरकडे रवाना केली. त्या ठिकाणावरून माहिती घेत पोलिसांच्या पथकाने दौलताबाद शिवारात जाऊन व्यापाऱ्याची सुखरुप सुटका केली. यावेळी पोलिस व अपहरणकर्त्यांमध्ये झटापट झाली. यामध्ये पोलिसांनी सुरजसिंग उर्फ सुरेंद्रसिंग गाडीवाले, राधेश्‍याम भालेराव (रा. नांदेड), शेख तौसीफ शेख समीर, सईद शाकेर अली, शेख नजीर (रा. छत्रपती संभाजीनगर), मुदस्सर हुसेन (रा. खलवट चारमिनार, हैद्राबाद) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कार, दोन पिस्टल व १ जिवंत काडतूस व ९ मोबाईल असा १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी सांगितले. या आरोपींवर तेलंगणा, कर्नाटक, नांदेड या भागात जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे अाहेत. गुन्हेगारांची हि अंतरराज्य टोळी असून त्यांनी या घटनेपुर्वी तीन दिवस आधी शिंदे यांच्या दुकानाची रेकी केली होती. त्यानंतर आरोपींनी एकत्र येऊन अपहरण केल्याचे स्पष्ट झाले आहे. या आरोपींवर मोक्का लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article