गडचिरोली येथे जादुटोण्याच्या संशयाने रस्त्यात अडवून वृद्धेचा गळा चिरुन खून केला.File Photo
Published on
:
26 Nov 2024, 7:27 am
Updated on
:
26 Nov 2024, 7:27 am
गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : जादुटोणा करीत असल्याच्या संशयावरुन एकाने वृद्धेला रस्त्यात अडवून तिची गळा चिरुन हत्या केली. या घटनेमुळे सिरोंचा तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा गावात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (दि.२५) दुपारी घडली. रुकमा बकय्या दुर्गम (वय ६४) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणातील आरोपी बापू किष्टय्या कुमरी (वय ३८) फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (Gadchiroli Murder Case)
सोमवारी दुपारी रुकमा दुर्गम ही एका महिलेसोबत गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीवर कपडे धुण्यासाठी जात होती. बापू कुम्मरी हा दोघींच्या मागे गेला. दोन्ही महिलांना अडविल्यानंतर दुसऱ्या महिलेला बापूने चाकूचा धाक दाखवून घरी परत जाण्यास सांगितले. गावात कुणाला काहीही न सांगण्याचीही त्याने तंबी दिली. त्यानंतर बापूने रुकमा दुर्गम हिच्या गळ्यावर चाकूने वार केले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने रुकमाबाईचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला. (Gadchiroli Murder Case)
रुकमाबाई ही जादुटोणा करते, असा बापू कुम्मरी यास संशय होता. दोन दिवसांपूर्वी दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडण झाले होते, अशी माहिती आहे. याप्रकरणी बामणी पोलिसांनी आरोपी बापू कुम्मरी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी पोलिस अधिकारी प्रमोद कुरसुंगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दांडे पुढील तपास करीत आहेत.