गृहमतदानाचा पर्याय निवडला असल्याने अडचण:अमरावतीत ‘त्या’ १७४ मतदारांना मतदानाचा अधिकार नाही
2 days ago
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान उद्या, बुधवार २० नोव्हेंबर रोजी होणार असले तरी जिल्ह्यातील १७४ मतदार असे आहेत, ज्यांना मतदानच करता येणार नाही. यामध्ये ८५ वर्षांहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीत त्यांच्यासाठी गृह मतदानाचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे ज्या कुटुंबांमध्ये ८५ वर्षांहून अधिक वयाचे सदस्य आहेत, किंवा मतदान केंद्रांवर पोहचून मतदान करण्यासाठी जे वयस्कर नागरिक सक्षम नाहीत, अशा सदस्यांनी गृह मतदानाचा पर्याय स्वीकारला होता. याशिवाय शारीरिक अपंगत्व असलेल्या दिव्यांगांनाही ही संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्याच्या आठही मतदार संघातील २ हजार ८१८ मतदारांनी हा पर्याय स्वीकारला होता. परंतु प्रत्यक्षात २ हजार ६४४ (९३.८८ टक्के) मतदार या प्रक्रियेत सहभागी झाले. काही कारणास्तव १७४ मतदार त्यात सहभागी होऊ शकले नाहीत. निवडणूक यंत्रणेच्या मते १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात गृह मतदानाचे अभियान राबविण्यात आले. यादरम्यान हे मतदार त्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी आढळून आले नाहीत. काही जण नियमित तपासणीसाठी बाहेरगावी डॉक्टरांकडे गेले होते, तर काही जण अत्यवस्थ असल्यामुळे मतदान करु शकत नव्हते. याशिवाय काही जणांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास थेट नकार दिला. आता या मतदारांनी थेट मतदान केंद्रांवर पोहचून मतदान करण्याची तयारी दर्शविली तरी त्यांना मतदान करता येणार नाही, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा पद्धतीची पहिलीच निवडणूक गृह मतदानाची संधी उपलब्ध झालेली विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. आतापर्यंत रुग्ण शय्येवर असलेल्या किंवा दिव्यांग मतदारांना बाह्य साधनांचा आधार घेऊन मतदानाला जावे लागत होते. मात्र निवडणूक आयोगाने नवा पर्याय उपलब्ध करुन दिल्याने अनेकांची सोय झाली आहे. त्यांना मतदानाचा अधिकार नाही एकदा गृह मतदानाचा पर्याय स्वीकारला, तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्याच्या नावासमोर विशिष्ट खूण केली जाते. ही खूण असलेली यादीच संबंधित मतदान केंद्राध्यक्षांना दिली जाते. त्यामुळे त्यांना मतदान केंद्रावर पोचल्यानंतरही मतदान करता येत नाही, असे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)