१ हजाराची लाच घेताना कृषी सहायकाला अटक केली.Pudhari File Photo
Published on
:
04 Feb 2025, 7:40 pm
Updated on
:
04 Feb 2025, 7:40 pm
चंद्रपूर : शेतमालावर फवारणी करण्यासाठी लागणारे बॅटरी स्प्रे पंप देण्यासाठी एक हजाराची लाच मागणाऱ्या कृषी सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.५) रंगेहाथ अटक केली. या घटनेने कृषी विभागात खळबळ उडाली आहे. सरजीव अजाबराव बोरकर (वय ३६) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय भदावती येथे बोरकर काम करत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मौजा माजरी कॉलरी (ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) येथील रहिवासी असून शेतकरी आहेत. त्यांची नंदोरी येथे शेती असून त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय भद्रावती येथे महाडिबीटी योजनेअंतर्गत बॅटरी स्प्रे पंप मिळवा, यासाठी सप्टेंबर २०२४ मध्ये अर्ज केला होता. त्यानुसार तक्रारदार यांना बॅटरी स्प्रे पंप सप्टेंबर २०२४ मध्येच मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी कृषी विभागामार्फत स्प्रे पंपाचे वाटप करण्यात आले होते. परंतु तक्रारदार बाहेरगावी असल्याने स्प्रे पंप घेवू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय भद्रावती येथे जावून कृषी सहायक सरजीव अजाबराव बोरकर यांची भेट घेतली असता कृषी स्प्रे पंप देण्यासाठी टाळाटाळ केली मात्र सोमवारी (दि.३) त्यांनी तक्रारदार यांना फोन करून बॅटरी स्प्रे पंप देण्यासाठी एक हजाराच्या लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाला तक्रार केली. त्यानंतर सापळा रचून लाचलुचपतने कृषी सहाय्यकाला रंगेहाथ ताब्यात घेतले.