Published on
:
25 Nov 2024, 1:01 pm
Updated on
:
25 Nov 2024, 1:01 pm
नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, संसदेचे चार आठवड्यांचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. विरोधी पक्षांवर ताशेरे ओढत पंतप्रधान मोदी म्हणाले की, निवडणुकीच्या काळात जनतेने नाकारलेले लोक सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात. सलग ८०-९० वेळा जनतेने नाकारलेले लोक संसदेत चर्चा होऊ देत नाहीत. त्यांना जनतेच्या आकांक्षा कळत नाहीत. मला आशा आहे की, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रत्येक पक्षातील नवीन सदस्यांना त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळेल, असे ते म्हणाले.
जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे आणि संसदेचा वेळ अशा प्रकारे वापरला गेला पाहिजे की त्यामुळे जागतिक स्तरावर भारताला मिळालेला आदर बळकट होईल, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या 'फलदायी हिवाळी अधिवेशनाची' अपेक्षा व्यक्त केली. हे अधिवेशन आगामी पिढ्यांना प्रेरणा देणारे असायला हवे, असे ते म्हणाले. भारताचे मतदार लोकशाहीला समर्पित आहेत, संविधानाप्रती त्यांचे समर्पण आहे, संसदीय कार्यपद्धतीवर त्यांचा विश्वास आहे, संसदेत बसलेल्या आपल्या सर्वांना जनतेच्या भावनांनुसार जगावे लागेल आणि हीच गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रत्येक विषयाचे विविध पैलू आपण सभागृहात अतिशय योग्य पद्धतीने अधोरेखित केले पाहिजेत, येणाऱ्या पिढ्यांनाही त्यातून प्रेरणा मिळेल. संविधान दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचा अभिमान वाढवण्यासाठी, जगात भारताच्या प्रतिष्ठेला बळ देण्यासाठी, नवीन खासदारांना संधी देण्यासाठी आणि नवीन विचारांचे स्वागत करण्याचे आवाहन सर्व खासदारांनी पंतप्रधान मोदी यांनी केले.