Published on
:
15 Nov 2024, 6:46 am
Updated on
:
15 Nov 2024, 6:46 am
पालघर : पालघर जिल्ह्यात सहा विधानसभांमध्ये प्रमुख लढत असलेल्या १५ विविध पक्षाच्या उमेदवारांपैकी ११ उमेदवारांवर विविध पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. तर चार उमेदवारांवर एकही गुन्हा दाखल नाही. विक्रमगड विधानसभा मतदारसंघामधील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील भुसारा, भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र भोये तर नालासोपारा मतदार संघातील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर व बोईसर मतदारसंघमधील शिवसेनेचे उमेदवार विलास तरे या उमेदवारांवर एकही गुन्हा दाखल नसल्याचे त्यांनी दिलेल्या नामनिर्देशनपत्रातील प्रतिज्ञापत्रात दिसून येत आहे.
नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्तीचे उमेदवार धनंजय गावडे यांच्यावर सर्वाधिक गुन्हे नोंद असल्याचे दिसून येते. २०१८ मध्ये त्यांच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत सात तर याच वर्षी विरार पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध चार गुन्हे नोंद होते. २०१७ मध्ये तुळींज पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. यामध्ये चार दोषारोपपत्र न्यायालयात डिसेंबर २०२१ मध्ये दाखल असून ही प्रकरणे वसई न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहेत. या मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांच्यावर एकही गुन्ह्याची नोंद नाही. तर भाजपतर्फे उमेदवारी मिळून निवडणुकीच्या रिंगणात असलेले राजन नाईक यांच्यावर २०२१ मध्ये माणिकपूर, वालीव, अर्नाळा, तुळींज, विरार, वसई अशा पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक तर २०२० मध्ये विरार माणिकपूर येथे प्रत्येकी एक व २०२२ मध्ये विरार पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. ही प्रकरणे न्यायासाठी न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालयात प्रलंबित आहेत असे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
वसई विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांच्यावर १९९३,१९९७,२००९, २००६, साली विरार पोलीस ठाण्यात तर २०१० मध्ये माणिकपूर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याची नोंद आहे. वसई न्यायालयात या गुन्ह्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. या प्रकरणांमध्ये अजूनही दोषारोप नाहीत असे त्यांनी नामनिर्देशन प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. भाजपकडून या विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळालेल्या स्नेहा दुबे पंडित यांच्यावर २०१२ मध्ये वसई पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद असून हे प्रकरण वसई न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे.
पालघर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे जयेंद्र दुबळा यांच्यावर चार गुन्ह्यांची नोंद असून २०१३ व २०२४ या वर्षी त्यांच्यावर कासा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. तर २०१८ व २०२३ मध्ये वाणगाव पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. त्यांच्यावर २०१९, २०२३ व २०१३ या सालामध्ये दोषारोप ठेवण्यात आ लेले आहेत, असे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. दुबळा यांच्यावर कासा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या २०२४ च्या गुन्ह्याचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या मतदारसंघांमध्ये शिवसेनेतर्फे निवडणूक लढवत असलेले राजेंद्र गावित यांच्यावर मिरा रोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात २००० साली गुन्हा दाखल असल्याची नोंद असून हा खटला ठाणे प्रथमवर्ग न्यायालयात प्रलंबित आहे.
डहाण विधानसभा मतदारसंघात प्रमुख लढत असलेल्या भाजप व माकपच्या दोन्ही उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्याच्या नोंदी आहेत. भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांच्यावर २०१५ मध्ये तलासरी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असून त्यात ते निर्दोष असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तर २०१८ मध्ये तलासरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात २०२४ मध्ये आपसात तडजोड केल्याचे म्हटले असून २०१७ मध्ये दाखल असलेल्या तलासरी पोलीस ठाण्याच्या एका गुन्ह्यामध्ये निर्दोष असून एका गुन्ह्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. २०१७ च्या एका गुन्हामध्ये त्यांना सिद्धदोषी ठरवण्यात आले असून त्या विरोधात त्यांनी अपील केल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
बोईसर विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेले प्रमुख लढतीचे शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांच्यावर एकही गुन्ह्याची नोंद नाही. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्यावर १९९७ मध्ये गुन्हा दाखल असून वसई न्यायालयात हे प्रकरण न्यायासाठी प्रलंबित आहे. ठाकरे गटाचे उमेदवार डॉ. विश्वास वळवी यांच्यावर २०२१ मध्ये कापूरबावडी, कासारवडवली अशा दोन पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल असून २०२४ मध्ये त्यांच्यावर वर्तक नगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. यातील दोन गुन्ह्यांमध्ये दोष मुक्तीचा अर्ज वळवी यांनी वरिष्ठ न्यायालयात दाखल केला आहे व सुनावणीसाठी ही दोन्ही प्रकरणे प्रलंबित आहेत. २०१० मध्ये दाखल असलेल्या एका खटल्यात ठाणे न्यायालयाने त्यांना २०१५ मध्ये दोष सिद्ध मानले होते. मात्र त्यांचे वय, वर्तन व कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांना सुधारण्याची संधी देण्यात येऊन ५००० रुपयांच्या हमीवर त्यांची सुटका केली असल्याचे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.