Published on
:
17 Nov 2024, 11:33 pm
Updated on
:
17 Nov 2024, 11:33 pm
प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्यास आता केवळ काही तास उरले आहेत. उद्या सकाळपासून गावोगावी प्रत्येक बूथवर मतदार रांगेत शांततेने मतदान करणार आहेत. या मतदारांच्या मनात काय आहे हे खरे तर अद्याप कुणालाच कळालेले नाही. असे असले तरी प्रत्येकजण आपल्याच विजयाचा दावा करत आहे. कुणीही एक पक्ष निवडणूक न लढवता तिघे तिघे मिळून युती आणि आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. आधी जागावाटपावरून घमासान झाले, म्हणजेच घमासान असे युद्ध झाले. जास्तीत जास्त जागा आपल्या वाट्याला याव्यात यासाठी पुरेपूर प्रयत्न केले गेले. एकदाचे जागावाटप मार्गी लागल्यानंतर कुणाचा किती स्ट्राईक रेट असणार आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.
स्ट्राईक रेट हा खरे तर क्रिकेटमधला शब्द आहे. एखाद्या फलंदाजाने समजा 100 बॉल खेळले आणि त्याने त्यावर शंभर रन काढले तर त्याचा स्ट्राईक रेट 100 आहे, असा याचा अर्थ होतो. 100 चेंडूंत त्याने 110 धावा काढल्या तर त्याचा स्ट्राईक रेट 110 असतो. प्रत्येक पक्षाच्या वाट्याला आलेल्या जागांमधील तो जितक्या जास्त जागा जिंकेल, तितका त्याचा स्ट्राईक रेट चांगला असणार आहे. पाहता पाहता स्ट्राईक रेट या शब्दाने सध्याचे राजकारण व्यापून टाकले आहे. घमासान युद्ध म्हणजे निकराची किंवा अटीतटीची लढाई होय. आता नाही तर कधीच नाही या त्वेषाने जेव्हा युद्ध होते तेव्हा त्याला घमासान युद्ध असे म्हणतात. साम, दाम, दंड, भेद, जात, धर्म हे सर्व स्वतःलाच माफ करून घेऊन सगळे पक्ष मैदानात उतरले आहेत. विविध मार्गांनी जनतेला साद घातली जात आहे. रेडिओ घ्या, दूरदर्शन घ्या, मोबाईल घ्या... तुम्हाला प्रत्येक पक्षाच्या जाहिराती पाहायला मिळत आहेत. मागील काळात कोणी काय केले याचेही डावपेच लढवले जात आहेत. जनता हे सर्व अभ्यासू डोळ्यांनी पाहात आहे, ऐकत आहे व वाचत आहे. राजकीयद़ृष्ट्या महाराष्ट्रातील जनता प्रगल्भ आहे, यावर आमचा विश्वास आहे आणि राज्याच्या हिताचे सरकार जनता निश्चितच निवडून देईल, असाही विश्वास आहे.
निवडून दिलेले पक्ष एकत्र राहतील की नाही यावर मात्र जनतेचे काहीही कंट्रोल नाही. एकमेकांची विचारधारा जुळत असो किंवा नसो, राजकारणाचा अपरिहार्य भाग म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगण्याची सध्या फॅशन आली आहे. ज्यांच्याबरोबर युती केली किंवा आघाडी केली, त्यांच्याबरोबर ते पक्ष राहतीलच याची काहीही खात्री नाही. एकदा का निवडणूक नावाची लढाई पार पडली की, मग सत्ता नावाच्या समीकरणासाठी डावपेच लढवले जाणार आहेतच. मुख्यमंत्रिपद हा या लढ्यातील कळीचा मुद्दा आहे. मी मुख्यमंत्री असण्याची शक्यता नाही किंवा मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार नाही, असे सर्वजण म्हणत असले तरी प्रत्येक पक्षाला आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी महत्त्वाकांक्षा मात्र निश्चितच आहे. मला मुख्यमंत्रिपद नको आहे, असे म्हणणार्या नेत्यांची सुप्त इच्छा ते मलाच मिळावे अशी आहे. एका पक्षाने तर पुढचे नेतृत्व आमचेच आहे, असाही दावा केला आहे. एकदाचे मतदान करून आपण कर्तव्य पार पाडले की, पुढे आपल्या हाती काहीही नसते.