तुम्हाला तुमचा मुलगाही निवडून आणता आला नाही; अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणाPudhari
Published on
:
08 Feb 2025, 3:58 am
Updated on
:
08 Feb 2025, 3:58 am
पुणे: तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही. तुम्ही काय आम्हाला बोलता, लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली. तेव्हा आम्ही रडत नाही बसलो, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांची जिल्हा नियोजन बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका घेणार्या राज ठाकरेंवर निशाणा साधला.
पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडी आणि मनसेला धूळ चारली. विधानसभा निवडणुकीत मनसेला खातेही उघडता आले नाही. विधानसभा निवडणुकीनंतर अनेकांनी निकालावर संशय व्यक्त केला.
महाविकास आघाडीतील काही नेत्यांनाही निकाल मान्य केला नव्हता. त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भर पडली आहे. राज ठाकरेंनीही विधानसभा निवडणुकीवर संशय व्यक्त केला. त्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांना पैसे दिले आहेत, ते परत घेणार नाही. पुढील कालावधीसाठी पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यासाठी सर्व्हे सुरू आहे.
डीपीडीसीसाठी सर्व जिल्ह्यांना मागील वेळेपेक्षा जास्त निधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कृषी विभागातील खरेदी संर्दभात पुरावे असल्याशिवाय कारवाई होणार नाही. अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे या दोघांनी आपली बाजू मांडली आहे. त्याची शहानिशा केली जाईल. त्यानंतर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.