क्रूरतेचा कळस! घरगुती वादातून आईनेच केली दोन मुलांची हत्याPudhari
Published on
:
08 Feb 2025, 6:57 am
Updated on
:
08 Feb 2025, 6:57 am
रावणगाव: स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील शिंदे वस्ती परिसरात घरगुती वादातून आईकडून दोन लहानग्या मुलांची हत्या करण्यात आली असून नवऱ्यावर देखील प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही घटना शनिवारी (दि. ८) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली असून दोन मुलांची हत्या करून नवऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यामागील खरे कारण समजू शकले नसल्याचे माहिती दौंड पोलिसांनी दिली. या घटनेत पिऊ दुर्योधन मिंढे या सव्वा दोन वर्षे मुलीचा, तर सव्वा वर्षीय शंभू दुर्योधन मिंढे या मुलाचा निर्दयी आईने गळा व तोंड दाबून हत्या केली.
यासह दुर्योधन आबासाहेब मिंढे (वय ३५) या पतीवर झोपेतच असताना मानेवर व डोक्यावर तिष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले आहे. जखमी दुर्योधनवर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहे. दौंड पोलिसांनी कोमल दुर्योधन मिंढे (वय ३२) हीस आपल्याच निरागस लहानग्या मुलांच्या खून प्रकरणी ताब्यात घेतले आहे
या दुर्दैवी घटनेने स्वामी चिंचोली परिसरात शोककळा पसरली असून कोमल हिच्या निर्दयपणाने दोन मुलांना जीव गमववा लागला असून या प्रकरणाला पती-पत्नीमधील घरगुती वादाची किनार असली तरी हत्याकांडापर्यंत प्रकरण गेल्याने दौंड पोलीस या प्रकरणाचा कसोशीने तपास करीत आहेत.
दुर्योधन मिंढे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून खराडी येथील एका खासगी कंपनीत काम करत असून तो सध्या घरूनच कामकाज करीत होता. दोन्ही पती-पत्नी उच्चशिक्षित असतानाही वरील दुर्दैवी प्रकार घडल्याने अनेकांनी शंका उपस्थित केली आसून दौंड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कुंभार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोरख मलगुंडे घटनास्थळी उपस्थित राहून अधिक तपास करीत आहेत.