शहरात 250 पेक्षा अधिक आरओ प्लांट
पिंपरी-चिंचवड शहरात 250 पेक्षा अधिक खासगी व्यावसायिकांचे आरओ प्लांट असल्याचा अंदाज आहे. रहिवाशी, नागरिक, लेबर कॅम्प, बांधकाम साईट, खासगी कार्यालये, संस्था, बँका, मंगल कार्यालये, कंपन्या, एमआयडीसी, लघुउद्योग आदी ठिकाणी जारचे आरओ पाणी पिण्यासाठी सर्रासपणे वापरले जाते. तसेच, विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांसाठीही जारचेच पाणी वापरले जाते.
काही ठिकाणी अल्पदरात पिण्यास अयोग्य असलेले पाणी विकले जाते. प्लांटसाठी बोअरिंग, विहिरी, महापालिका व एमआयडीसीचे पाणी वापरले जाते. कमी भांडवलात फायदा देणारे वॉटर फिल्टर गल्लीबोळात सुरू आहेत. ते पाणी दूषित असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. अशा आरओ प्लांटवर एफडीओकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, जीबीएस आजाराचा प्रसार होऊ नये, म्हणून महापालिकेने पुढाकार घेत कारवाईचा बडगा उगारला आहे.
पाणीपुरवठा विभागाची पथके करणार कारवाई
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची, क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथके अनधिकृत आरओ प्लांटवर कारवाई करणार आहेत. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, प्लंबर, सुरक्षारक्षक यांचा पथकात समावेश आहे. आरओ प्लांट बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर वैद्यकीय विभागामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.