विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील 'कासारी' धरणात ७८ तर 'कडवी'त ८३ टक्के पाणीसाठा शनिवारी (दि. ८) सकाळी होता. धरण प्रशासनाने धरणातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्याने जिल्ह्यात सर्वांधिक पाणीसाठा कडवी धरणात आहे. परिणामी कडवी नदी काठावरील २३ गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नसल्याचे दिलासादायक चित्र आहे, अशी माहिती कडवी धरण शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी दिली.
कडवी धरणाची पाणी साठवण क्षमता ७१.२४० दलघमी म्हणजे २.५१ टीएमसी आहे. दरवर्षी १०० टक्के धरण भरते. धरण क्षेत्रात साडेतीन-चार हजार मिमी इतका पाऊस पडतो. यावर्षी धरण तीनदा ओव्हर फ्लो झाले. शनिवारी सकाळी सात वाजता धरणाच्या पाण्याची पातळी ५९८.४५ मीटर, उपयुक्त पाणीसाठा ५८.२७ दलघमी ( २.०६ टीएमसी) म्हणजेच ८३ टक्के इतका आहे. दरवर्षी याच दिवशी ५९७.६५ मीटर तर धरणाचा पाणीसाठा ५५.५६ दलघमी होता. गतवर्षीपेक्षा धरणात सहा टक्के पाणीसाठा अधिक आहे. त्यावेळी धरणात १.९४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता.
कडवी धरणावर परळे निनाई, भेंडवडे, लोळाणे, पुसार्ले, आळतुर, वारूळ, करुंगळे, निळे, कडवे, येलूर, पेरिड, भोसलेवाडी, गाडेवाडी, मलकापूर, कोपार्डे, सांबु, शिरगाव, ससेगाव, सावर्डे, मोळवडे, सवते, शिंपे, पाटणे ही २३ गावे अवलंबून आहेत. कडवी नदीवर पाणी साठवणुकीसाठी वालुर, सुतारवाडी, करुंगळे, भोसलेवाडी, पेरिड, शिरगाव, सावर्डे, पाटणे या आठ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून पाणी अडवल्याने नदीपात्रात पाणीसाठा भरपूर आहे.
कासारी (गेळवडे) या प्रमुख मध्यम प्रकल्पासह पडसाळी, पोंबरे, नांदारी, कुंभवडे, व केसरकरवाडी हे लघु पाटबंधारे प्रकल्प येतात. गेळवडे या मुख्य धरणाची पाणीसाठा क्षमता २.७७७ टीएमसी आहे. या प्रकल्पामधून शाहूवाडी तालुक्यातील २० गावांना व पन्हाळा तालुक्यातील बहुतांशी म्हणजे ४१ गावांना कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामधून पाणी मिळते. उन्हाळ्यात पाणी अडविण्यासाठी नदीवर जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे १४ बंधारे आहेत. धरणात उपयुक्त पाणीसाठा ६०.४७ दलघमी म्हणजे ७७.५७ टक्के आहे. धरणाची पाणीपातळी ६१९.४६ मीटर इतकी आहे. गतवर्षी याच दिवशी धरणात ७९ टक्के पाणीसाठा होता.
जिल्ह्यात सर्वाधिक पाणीसाठा कडवी धरणात
तालुक्यातील कडवी धरणात ८३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून जिल्ह्यातील धरणांपैकी सर्वाधिक पाणीसाठा या धरणात आहे. आजमितीला धरणात उपयुक्त पाणीसाठा २.०६ टीएमसी आहे. त्याखालोखाल तुळशी धरणात ८२ टक्के पाणीसाठा आहे.
यंदाचा आणि गेल्यावर्षी ८ मेचा कंसातील उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये धरणनिहाय असा : राधानगरी ६.०१ (५.६१), तुळशी : २.६८ (२.३०), दूधगंगा : १४.७७ (१४. ७७), वारणा : १९.७४ (१८.४८), कासारी : २.१४ (२.१९), कडवी : २.०६ (१.९४), कुंभी : २.२० (२.२७), पाटगाव : २.८७ (२.८९).
मध्यम व लघुमध्यम प्रकल्प व उपलब्ध पाणीसाठा असा :
प्रकल्प उपलब्ध पाणीसाठा टक्के
कडवी ५८.२७ दलघमी ८३
कासारी ६०. ४७ दलघमी ७८
कासार्डे लघुप्रकल्प २.२१० दलघमी ५३
मानोली ३.७०७ दलघमी ७५
पालेश्वर धरण ७.०४० दलघमी ७९