अजित पवार , रामदास आठवलेFile Photo
Published on
:
08 Feb 2025, 3:46 pm
Updated on
:
08 Feb 2025, 3:46 pm
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि आम आदमी पक्ष या दोन पक्षांच्या उमेदवारांचाच विजय झाला आहे. इतर कोणत्याही पक्षाला खाते उघडता आले नाही. यामध्ये काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षांचा समावेश आहे. राज्यात महायुतीत आणि केंद्रात एनडीएमध्ये घटकपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि रिपाई आठवले गट दिल्लीत स्वबळावर लढले होते. मात्र, या दोन्ही पक्षांच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे.
शनिवारी, दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ ०.०५ टक्के मते मिळाली आहेत. पक्षाने ३० जागांवर उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये काही उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगाने छाननीत काढून टाकले होते. निवडणूकीच्या अंतिम रिंगणात पक्षाकडून २३ उमेदवार होते. या सर्व उमेदवारांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर रामदास आठवलेच्या पक्षाच्या उमेदवारांनाही सारख्याच परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. दिल्लीत एखादा अपवाद वगळता अजित पवारांच्या पक्षाच्या इतर उमेदवारांना १ हजार मतांचा टप्पाही ओलांडता आला नाही. काही उमेदवार तर १०० मतेही मिळवू शकले नाहीत. तसेच अनेक मतदारसंघांमध्ये नोटापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आणि रामदास आठवलेंच्या उमेदवारांना कमी मते मिळाली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी आणखी प्रतिक्षा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. तसेच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. तो परत मिळवण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्ली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे तूर्तास त्यांना राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.