विटा पकडलेल्या गांजाच्या मुद्देमालासह पोलीस उपविभागीय अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे, उत्तम माळी आणि त्यांचे पथक. pudhari photo
Published on
:
08 Feb 2025, 5:44 pm
Updated on
:
08 Feb 2025, 5:44 pm
विटा : विटा पोलिस ठाण्याच्या धडक कारवाईत साळशिंगे (ता. खानापूर) आणि मायणी (ता.खटाव, जि. सातारा) येथील दोन गांजा विक्रेत्या महिलांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार उत्तम माळी यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की,पोलीस अधीक्षक संदीप घुगे,अप्पर पोलीस अधीक्षक रीतू खोखर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस हद्दीत अंमली पदार्थ विरोधी सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास सक्त गस्तीच्या सूचना दिल्या होत्या.
आज शनिवारी सकाळपासून गस्त सुरू असताना हवालदार संभाजी सोनवणे यांना टीप मिळाली की, साळशिंगेमध्ये वनवासवाडी रस्त्यालगतच्या एका घराजवळ एक महिला गांजा विकत आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना ही माहिती दिली. त्यावर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे, उत्तम माळी, सचिन खाडे,अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, विलास मोहिते, महेश देशमुख महेश संकपाळ आणि निलम जगदाळे यांना सोबत घेतले. साळशिंगे येथे गेले असता एक महिला तिच्या घराच्या बाहेर सोफ्यात गांजाची विक्री करताना सापडली. त्यावर तिथेच छापा टाकला असता या महिलेचे नाव हुसेनबी गुलाब शेख असल्याचे समजले. तिला ताब्यात घेवुन तिच्याकडील पिशवीची झडती घेतली असता त्यात उग्र वासाचा ६२५ ग्रॅम तयार गांजा होता. त्यावर या पोलिस पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना त्या ठिकाणी बोलावले.
त्यानंतर हुसेनबी शेख या संशयित महिलेला गांजा कोठुन आणला आहे याबाबत अधिक विचारणा केली असता तिने तो गांजा मायणी येथील शोभा बाळकृष्ण चिवटे हिच्याकडून घेतला असे सांगितले. त्यावर या पथकाने मायणी येथे जावून शोभा चिवटे या महिलेच्या घराचीझडती घेतली असता तिथे १२ किलो २३१ ग्रॅम असा एकूण १२किलो८५६ ग्रॅम तयार उग्र वासाचा गांजा सापडला. त्यामुळे या दोन्ही संशयित महिलांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे पुढील तपास करीत आहेत.