Published on
:
08 Feb 2025, 5:13 pm
Updated on
:
08 Feb 2025, 5:13 pm
आटपाडी : आटपाडी येथे तालुक्याच्या शेळी-मेंढी आठवडा बाजारात पोलीस व्यापाऱ्यांकडून सक्तीची वसुली करत असल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी व संचालकांनी केला आहे. पोलिसांच्या या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये दर शनिवारी जनावरांचा मोठा बाजार भरतो. यामध्ये सांगली,सातारा सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कराड परिसरातून मोठया संख्येने व्यापारी हजेरी लावतात.चारचाकी वाहनातून व्यापारी व शेतकरी शेळ्या मेंढ्या खरेदी करण्यासाठी येतात. माल खरेदी करून जाणाऱ्या व्यापाऱ्याना आणि चार चाकी वाहनांना आटपाडीत अडवून सक्तीने वसुली केली जाते असा आरोप शनिवारी पत्रकार परिषदेत करण्यात आला.
बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, ज्येष्ठ संचालक सुबराव पाटील, माजी उपसभापती राहुल गायकवाड, सुनील तळे, सचिव शशिकांत जाधव, व्यापारी विशाल नलवडे, परवेझ मुल्ला, साबुद्दीन कसाई, लतीफ कसाई, काशीम मुल्ला, नजीर जमादार,असिफ खाटीक, सरदार जमादार, जुनेद कसाई यावेळी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या लुटीची तक्रार केली.शनिवारी आटपाडी-करगणी, आटपाडी -दिघंची,आटपाडी- सांगोला,आटपाडी निंबवडे रस्त्यावर वाहतूक शाखेकडून नियुक्त दोन कर्मचारी आणि खाजगी चार व्यक्ती ही वसुली करतात.पैसे नाही दिले तर ऑनलाईन दंड करण्याची धमकी दिली जाते असा आरोप व्यापाऱ्यांनी केला.
सभापती पुजारी म्हणाले की खरसुंडी जनावरांच्या यात्रेमध्ये एका वाहनाकडून 300 ते 400 रुपये वसुली एका वाहतूक पोलिसाने केली आहे.वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याला वारंवार समज देऊन देखील त्याला फरक पडत नाही. या कर्मचाऱ्यांनी हप्त्यातील रक्कम आम्हाला वरिष्ठांना द्यावी लागते अशी सफाई दिल्याचे सभापती पुजारी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान वाहतूक शाखेच्या माध्यमातून गैरप्रकार होत असल्यास आटपाडी पोलीस ठाण्यास कळवावे.एखादी खाजगी व्यक्ती गाड्या अडवून पैसे मागत असल्यास माहिती द्यावी त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील व वाहतूक शाखेकडे असणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी सांगितले.