यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
नायब तहसीलदार बनून आलेल्या व्यक्तीने शहरातील किराणा, भांडे व्यावसायिक व आचारी यांना ३३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी रोजी महागाव येथे उघडकीस आला.
महागाव शहरातील किराणा दुकानावर एक व्यक्ती शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आला. आपले नाव देशमुख असून आजच महागाव तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून रुजू झाल्याचे सांगितले. आपल्याकडे लग्न समारंभ असून त्यासाठी किराणा साहित्य पाहिजे असल्याचा बहाणा केला.
त्यांच्याकडून काजू, बदाम, अंजीर, पिस्ता असा १८ हजार रुपये किंमतीचे किराणा सामान, भांडे विक्रेत्यांकडून एक मिक्सर, इंदिरानगरमधील आचारी नारायण लक्ष्मण कोल्ही यांच्याकडून रोख १९,६०० व ११०० रूपये किमतीचा मोबाईल असा मुद्देमाल घेतला. थोड्यावेळाने पैसे आणून देतो असे सांगून पोबारा केला. परंतु बराच वेळ होऊनही व्यक्ती परत न आल्याने आपण गंडविल्या गेलो याची उपरती किराणा व्यावसायिक व भांडे विक्रेता यांना झाली. त्यानंतर कोल्ही यांनी महागाव पोलीस स्टेशन गाठुन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला व तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.