Published on
:
08 Feb 2025, 6:04 pm
Updated on
:
08 Feb 2025, 6:04 pm
नागपूर : लाडकी बहीण योजना जाहीर झाली त्याचवेळी त्याचे सर्व निकष सरकारतर्फे जाहीर करण्यात आले होते. मात्र अनेकांनी ते पाळलेले नाहीत. मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने त्यावेळी त्याची पडताळणी होऊ शकली नाही. आता पडताळणी होत असल्याने शेवटी यात सरकारची चूक नव्हे तर ज्यांनी ते निकष पाळले नाही त्यांची ती चूक असल्याचे भाजप नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावरून आता लाडक्या बहिणीमधली अस्वस्थता अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही दिवसात लाडक्या बहिणींमध्ये या योजनेचे लाभ नाकारण्यावरून नाराजी असल्याच्या प्रश्नात ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, नाराजी बाबतीत बोलणे त्यांनी टाळले. करुणा मुंडे यांनी केलेल्या आरोपासंदर्भात छेडले असता ते दोघे पती-पत्नी असल्याने तेच अधिक स्पष्टपणे सांगू शकतात असा सावध पवित्रा घेतला.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजय हा केजरीवाल यांनी सर्व फुकट देत, विकास व प्रगतीला निर्माण केलेला अडसर दूर करणारा, विकासाला वेग देणारा असल्याची प्रतिक्रिया दिली. तेलंगाना, महाराष्ट्र पाठोपाठ दिल्लीत डबल इंजिनचे सरकार आले असल्याने यापुढे बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजप आणि नितीश कुमार यांचे सरकार सत्तेत येईल असा दावा केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या पराभवाबाबत पुन्हा एकदा वाढलेले मतदार, ईव्हीएम असा मुद्दा पुढे केला या संदर्भात विचारले असता नापास झालेल्या विद्यार्थ्यांसारखे ते बोलत आहेत. पराभवाची पूर्वतयारी करीत आहेत. फार गांभीर्याने त्यांना घेण्याची गरज नाही. कर्म तैसे फळ त्यांना मिळाले आहे हेच सांगणारा हा निकाल आहे. जेव्हा जिंकतात तेव्हा त्यांना सर्व काही ऑल वेल असते असा टोला लगावला.