Published on
:
08 Feb 2025, 6:16 pm
Updated on
:
08 Feb 2025, 6:16 pm
नागपूर : विदर्भात जंगलासह पर्यटनाच्या विपुल संधी व त्या अनुषंगाने दहा लाख रोजगार उपलब्ध आहेत. सकारात्मक हिमतीने पुनर्गुंतवणूक केल्यास पर्यंटन विभागाची सक्सेस स्टोरी होण्यास विलंब लागणार नाही, विदर्भ पर्यटन उद्योगात अव्वल ठरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री व खासदार औद्योगिक महोत्सवाचे प्रणेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
खासदार औद्योगिक महोत्सव समिती आणि असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट तर्फे आयोजित अॅडव्हान्टेज विदर्भ 2025 खासदार सांस्कृतिक महोत्सव मध्ये ‘द फ्युचर ऑफ टुरिझम अँड सस्टेनेबल ग्रोथ’ या विषयावर आधारित परिषदेत ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात झालेल्या या परिषदेत आ. अॅड. आशिष जयस्वाल, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, अर्बन डेव्हलपमेंट विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, हॉटेल प्रीतमचे व्यवस्थापकीय संचालक तेजिंदरसिंग रेणू, हॉटेल अशोकचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, तथास्तु रिसॉर्टचे व्यवस्थापकीय संचालक अनिल अग्रवाल, स्मार्ट फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज महाजन, सीएसी ऑलराऊंडरचे संचालक अमोल खंते, व्हेकेशन ऑन व्हील्सचे व्यवस्थापकीय संचालक राहुल सोमण यांची उपस्थिती होती.
नितीन गडकरी म्हणाले, विदर्भाचा मोठा भाग जंगलाने व्यापलेला आहे, वाघांची संख्या वाढत आहे. विश्वभरातील पर्यटकांसाठी विदर्भात वाइल्ड लाइफसह आकर्षणाचे अनेक केंद्र आहेत. पर्यटनामुळे विदर्भात रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. ऑक्सिजन बर्ड पार्क, आंबोरा, ताडोबाच्या विकासासोबतच स्थानिकांना लाभ, पर्यावरणाचा विचारही करण्यात आलेला आहे. टॅक्सी ड्रायव्हर अॅप, विदर्भातील विशेष खाद्यसंस्कृती, कलाकुसर दर्शविणारे व्यवसाय वाढवून आदिवासी बांधवांचाही उत्कर्ष करावा, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.
गडकरी यांच्या हस्ते यावेळी कृषी कल्याण 2025 या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन निकिता खंगर यांनी केले. प्रास्ताविक वेदच्या अध्यक्ष रिना सिन्हा यांनी केले. स्वागत तेजिंदरसिंग रेणू यांनी केले.