आधुनिक काळात मोबाईल ही प्रत्येकाची गरज बनला आहे. एका क्लिकवर सर्व गोष्टी झटपट करता येतात. वस्तू मागवण्यापासून संवाद, फोटो, व्हिडीओ सर्व काही एकाच गॅझेटच्या माध्यमातून होतं. त्यामुळे मोबाईल सर्वात आवश्यक वस्तू झाली आहे. त्यामुळे कुठे जाल तेथे तुमच्यासोबत मोबाईल असतो. इतकंच काय तर लोकं स्मशानातही मोबाईल घेऊन जातात. त्यामुळे पवित्र अपवित्र असं कोणतंच बंधन लागत नाही असं गॅझेट असल्याचं मिश्किलपणे सांगितलं जातं. टॉयलेटमध्येही तासंतास मोबाईल हाती घेऊन वेळ काढला जातो. अनेकांना टॉयलेटमध्ये बसून रील्स बघण्याची सवय आहे. यामुळे किती तास उलटून जातात हे देखील कळत नाही. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. . स्किन, पाईल्स आणि पचनसंस्थेशी निगडीत त्रास सहन करावा लागू शकतो. असं असताना दुसरीकडे, मोबाईलचा वापर टॉयलेटमध्ये केल्याने वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार, मोबाईलचा टॉयलेटमध्ये वापर केल्याने राहु ग्रह खराब होतो. टॉयलेटचा संबंध वास्तुशास्त्रात राहु या ग्रहाशी केला गेला आहे. त्याचबरोबर बुध ग्रह देखील कमकुवत होतो.
वास्तुशास्त्रानुसार, राहु ग्रह खराब झाल्याने जीवनात हळूहळू अडचणी येऊ लागतात. त्याचा आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. तसेच बुध ग्रह कमकुवत झाल्याने व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेवर प्रहार होतो. संवादाची शैलीही बिघडते. अनेकदा शब्दही फुटत नाहीत. त्यामुळे आत्मविश्वास कमी होत होतो. जे लोक बाथरूममध्ये वारंवार मोबाईल फोन वापरतात त्यांना मानसिक विकार होण्याचा धोका असतो. त्यामुळे टॉयलेटमध्ये मोबाईल वापरू नये.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बाथरूम हे बॅक्टेरियांचे प्रजनन केंद्र आहे. त्यामुळे जर तुम्ही बाथरूममध्ये मोबाईल फोन वापरला तर मोबाईल स्क्रीनवर बॅक्टेरिया जमा होतील. तुमचा फोन दिवसभर हे बॅक्टेरिया वाहून नेतो. आपण तोच फोन हातात घेऊन फिरतो. परिणामी, हे जीवाणू हातांद्वारे शरीराच्या विविध भागात पसरतात. दुसरीकडे, मान वाकवून सतत मोबाईल फोनकडे पाहिल्याने स्पॉन्डिलायटिसचा धोका वाढतो. पाठदुखी आणि मानदुखी देखील होऊ शकते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)