दिल्ली विधानसभेचे निकाल धक्कादायक लागले असून याबाबत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात महाघोटाळा करत सत्तेत आलेल्या भाजपने असाच घोटाळा दिल्लीत केला आहे. घोटाळ्याचा महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीत राबवल्यानेच भाजपचा विजय झाला. महाशक्ती म्हणवणाऱ्यांच्या सत्ता, पैसा, यंत्रणापुढे आपचा निभाव लागला नाही. तसेच आप आणि काँग्रेस स्वतंत्र लढल्याने भाजपचा विजय झाला, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
गृहमंत्री अमित शहा यांचा एककलमी कार्यक्रम होता. त्यासाठी त्यांनी प्रचंड फौज उतरवली होती. दिल्लीत 10 वर्षे आपचे म्हणजे केजरीवाल यांचे राज्य होते. त्यांच्या कारभाराबाबत टीका टिपण्ण्या होत आहेत. आप हा एक आंदोलनातून आलेला पक्ष आहे. जनतेने त्यांना 10 वर्षे निवडून दिले. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करत दिल्लीचा विकास केला. मात्र, शेवटी महाशक्ती असलेल्या सत्ता, पैसा, यंत्रणा यांच्यापुढे आपचा निभाव लागू शकला नाही, असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात जे घडले तोच महाराष्ट्र पॅटर्न मोदी, शहा आणि त्यांच्या पक्षाने दिल्लीत राबवला. मतदारयादीत बाहेरची नावे घुसवली. ज्या ठिकाणी आपचा हमखास विजय मिळणार आहे, तिथे मतदारयादीतील नावे गायब करणे ,असे प्रकार करण्यात आले. असे महाराष्ट्रतही करण्यात आले, ते आता उघड होत आहे. असे सर्व उपक्रम राबवण्यात आले. एका- एका घरातून 300 ते 400 नावांची नोंदणी मतदारयादीत झाली आहे. दिल्लीतील ल्यूटेन बंगले आहेत. तिथे कोणी राहत नाही. तेथूनही नावनोंदणी झाली, असा त्यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल यांचा सुमारे 1200 मतांनी पराभव झाला आहे. त्या भागातील बंगल्यातून साधारण 200-300 मतांची नोंदणी झाली. जे तेथील रहिवासी नाहीत. तसेच या निवडणुकीत आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढले, हेदेखील पराभवाचे एक कारण आहे. याआधाही ते स्वतंत्रपणेच लढत होते. मात्र, यावेळी भाजपसारखा शत्रू अधिक ताकदीने, फौजा घेत मैदानात उतरला आहे, याचे भान त्यांनी ठेवायला हवे होते.आमच्या इंडिया आघाडीतील हे दोन पक्ष एकत्र आले असते तर आजचा निकाल नक्कीच वेगळा दिसला असता. केजरीवाल याचा आप आणि भाजप यांच्यात फार मोठे अंतर नाही. मतांची अंतर फक्त 2 टक्के आहेत तर काँग्रेसला 7.50 टक्के मते मिळाली आहेत. सुमारे 50 टक्क्यांवर काँग्रेस आणि आपची मते आहेत. ओमर अब्दुल्ला जे म्हणाले, ते सत्य आहे. आपापसात भांडत बसा, नंतर मोदींचा विजय झाला म्हणून छाती पिटत बसा. काँग्रेस आणि आपने एकत्र यावे, असे आमचे मत होते. इंडिया आघाडीतील अनेक पक्षांचे तेच मत होते. हरयाणात ते एकत्र आले नाहीत. त्याचा फायदा भाजपला झाला.दिल्लीत ते एकत्र आले नाही, त्याचा फायदा भाजपला झाला. इंडिया आघाडीतील पक्षांनी आपल्याला भाजपचा पराभव करायचा आहे, हे ठरवायला हवे. तंगड्यांत तगडे घालून भाजपचा मार्ग सुकर होत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज,गोपाल रॉय यांचा पराभव झाला आहे. फक्त आतिषी यांचा विजय झाला आहे. आपचे सर्व महत्त्वाचे आधारस्तंभ असलेले त्यांचे कॅबिनेट पराभूत झाले आहेत. जनतेने त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान केले. तरीही ते पराभूत झाले. समोरून ज्याप्रकारे हल्ले झाले, जे घोटाळे झाले. मात्र, आता निवडणुकीनंतर त्यावर चर्चा करण्यात आर्थ नाही. निवडणुकीत हार जीत महत्त्वाची असते. त्यामुळे आता त्यावर चर्चा करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रतही मतदारयादीत झालेला घोटाळा आम्ही उघड केला आहे. सुमारे 39 लाख मते वाढवण्यात आली. त्यावरच भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा विजय झाला. मात्र, निवडणूक आयोग हे ऐकायलाच तयार नाही. मात्र, भिंतीवर डोके आपटण्याशिवाय आमच्याकडे काहीही नाही. मात्र, आम्ही लोकशाहीसाठी भिंतीवर डोके आपटत राहू. देशातील लोकशाही टिकवण्यासाठी विरोधी पक्षांची महत्त्वाची भूमिका असते. लोकशाही वाचवण्यासाठी सुरू झालेली ही लढाई अर्ध्यावर सोडता येणार नाही. आम्ही देशासाठी आणि लोकशाहीसाठी लढत राहणार आहोत, असा निर्धारही संजय राऊत यांनी व्यक्त केला.