देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची 5 कारणे:BJP मध्ये फडणवीसांना पर्याय नाही, वाचा देवेंद्र यांच्या कोणत्या जमेच्या बाजू ठरल्या वरचढ
3 hours ago
1
महाराष्ट्रातील भाजप प्रणित महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. यासंबंधी एकनाथ शिंदे काहीसे नाराज असल्याची चर्चा आहे. पण अजित पवारांच्या पाठिंब्यामुळे सध्या तरी भाजपचा मुख्यमंत्री करण्यात कोणतीही अडचण दिसत नाही. पण भाजपसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणे सोपी गोष्ट नव्हती. आजवर त्यांचे ब्राह्मण असणे हे त्यांचे मुख्यमंत्री होण्याच्या विरोधात होते. याशिवाय महाराष्ट्र भाजपमध्येही त्यांच्याविषयी बरेच मतभेद होते. पण फडणवीस यांच्या काही मजबूत बाजू त्यांना मुख्यमंत्रीपदी न पाहणाऱ्यांवर भारी पडल्या. त्यामुळे भाजपपुढे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. 1) शिवसेना, राष्ट्रवादी फोडण्यात महत्त्वाची भूमिका देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे चाणक्य म्हणून उदयास येत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी कथित गद्दारी करत मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरला. त्यानंतर फडणवीस यांनी शरद पवारांसारख्या बलाढ्य राजकारण्याच्या जबड्यातून अजित पवारांसारख्या नेत्यांना खेचून आणले. पण त्यावेळी अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या आमदारांना आपल्यासोबत आणता आले नाही. त्यामुळे त्यांचा खेळ अवघ्या 80 तासांतच संपला. देवेंद्र फडणवीस यांचे हे पहाटेचे औटघटकेचे सरकार पडले. पण फडणवीस यांनी आपले प्रयत्न सोडले नाही. त्यामुळे भाजपला त्यांच्या जोरावरच शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये फूट पाडता आली. या फुटीमुळे देवेंद्र फडणवीस टीकेचे धनी ठरले. त्यांना यासंबंधी मोठा राजकीय त्रास सहन करावा लागला. उद्धव ठाकरेंपासून मनोज जरांगेंपर्यंत सर्वांनी फडणवीस यांना त्यांची राजकीय कारकीर्द संपवण्याची धमकी देण्यात आली. शरद पवारांनी तर कथितपणे त्यांची जातच काढली. पण त्यानंतरही देवेंद्र फडणवीस डगमगले नाहीत. महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी भाजपचा वारू पुढे नेण्याचे काम केले. त्यानंतर आपल्या पक्षाला पुन्हा सत्तेत आणून दाखवण्याचा करिश्माही करून दाखवला. 2) बिहार व मध्य प्रदेश मॉडेल महाराष्ट्रात चालणार नाही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर करण्यासाठी बिहार मॉडेलचा युक्तिवाद केला जात आहे. बिहारमध्ये जदयुला कमी जागा असतानाही भाजपने तिथे नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले. विशेषतः फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळे मागासवर्गीयांचे राजकारण लक्षात घेता मध्य प्रदेशाच्या धरतीवर एखाद्या फारशा चर्चेत नसणाऱ्या ओबीसी नेत्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोपवण्याचाही आग्रह धरला जात आहे. भाजपने गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशात हा प्रयोग केला. पण महाराष्ट्राची परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे. महाराष्ट्रात 6 पक्षांनी निवडणूक लढवली. त्यात 3 पक्षांना बहुमत मिळाले. त्यापैकी एखादा पक्ष नाराज झाला तर नवे समीकरण अस्तित्वात येण्याची शक्यता आहे हे भाजपला चांगलेच ठावूक आहे. यामुळेच भारतीय जनता पक्षाला येथे सोशल इंजिनिअरिंग विसरून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावे लागेल अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्याकडेच महायुतीमधील सर्व पक्षांची सूत्रे आहेत. एवढेच नाही तर साम दाम दंड भेद वापरून सरकार चालवण्याची ताकद त्यांच्या अंगी आहे. 3) भाजपकडून सर्वाधिक प्रचारसभा घेतल्या भाजपच्या नेतृत्वाला देवेंद्र फडणवीस यांची उंची व लोकप्रियतेची जाणीव होती. त्यामुळेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अधिकाधिक रॅली आणि प्रचार सभा घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्यांच्या ब्राह्मण असण्याने किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवर मतदार चिडले असते तर कदाचित त्यांना पक्षाचा मुख्य चेहरा बनवून बढतीची बक्षीशी दिली गेली नसती. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांहून जास्त सभा व रॅली घेतल्या. साहजिकच या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना बाजूला सारून एखाद्या नव्या नेत्याला मुख्यमंत्री केले तर पक्षांतर्गत असंतोष वाढण्याची भीती आहे. 4) संघ व भाजपचा विश्वसनीय चेहरा लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या हाराकिरीनंतर देंवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या समर्थनार्थ पुढे येऊन त्यांना त्यांच्या पदावर कायम राहण्याची विनंती केली होती. ही एक मोठी घटना होती. संघ अशा पद्धतीने कुणाचीही बाजू घेण्यासाठी स्वतःहून पुढे येत नाही. फडणवीस यांच्या यांच्या घरी संघ व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत यासंबंधीची बैठक झाली होती. त्यानंतर बावनकुळे यांनी बाहेर येऊन पक्षाने फडणवीस यांना त्यांच्या पदावर कायम राहण्याची विनंती केल्याचे सांगितले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या अनपेक्षित विजयात संघाचाही महत्त्वाचा वाटा होता, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. संघावर प्रत्येक वेळी विश्वास व्यक्त करणारे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस. यासोबतच देवेंद्र फडणवीस हेच ते नेते आहेत, ज्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याचाही अतूट विश्वास आहे. 5) उच्च श्रेणीचे प्रशासक व संघटक महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे. देशाच्या जीडीपीच्या 13 टक्के महसूल या एकट्या राज्यातून येतो. आजही देशात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक याच राज्यात येते. यंदाच्या आकडेवारीनुसार, पहिल्या तिमाहीत थेट परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासक म्हणून आपला ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रात अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण व्हायचा आहे. याशिवाय 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा मार्गही महाराष्ट्रातून जातो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीला मुख्यमंत्री करणे ही भाजपची मजबुरी आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)