नाहूर रेल्वे स्थानकावर तिकीट घेण्यासाठी गेलेल्या एका मराठी प्रवाशाला हिंदीत बोललास तरच तिकीट देऊ असे उर्मटपणे सांगणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी चांगलाच दणका दिला. सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी थेट नाहूर स्टेशनवरचे स्टेशन मास्तरांचे कार्यालय गाठले व त्यांनांच याचा जाब विचारला.
अमोल माने हा प्रवासी 24 नोव्हेंबर रोजी नाहूर रेल्वे स्थानकात आला होता. तिकीट खिडकीवर यावेळी सुखदेव सिंह हा एक उत्तर हिंदुस्थानी कर्मचारी होता. माने याने त्याच्याकडे तिकीट मागितले. मात्र अमोल मराठीमध्ये बोलल्याने सुखदेवने त्याला तिकीट देण्यास नकार दिला. तसेच हिंदीत बोलाल तरच तिकीट देऊ असं सांगितले. त्यामुळे अमोल भडकला व त्याने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. या व्हिडीओत त्या रेल्वे कर्मचाऱ्याचा उद्दामपणा दिसून येत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुनील राऊत यांनी त्यावर तत्काळ आक्षेप घेतला. त्यानंतर सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक थेट नाहूर स्थानकात पोहोचले व त्यांनी यायबाबत स्टेशन मास्तरांना जाब विचारला.