विधानसभा निवडणुकांचे कल येण्यास सुरुवात. Pudhari File Photo
Published on
:
22 Nov 2024, 11:49 pm
Updated on
:
22 Nov 2024, 11:49 pm
मंंडळी, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे कल येण्यास सुरुवात झालेली आहे. आपल्या विचारधारेचा पक्ष निवडून यावा, अशी प्रत्येकाची इच्छा असणे साहजिक आहे. ज्याला आपण मतदान केले तो उमेदवारही निवडून यावा, असे प्रत्येकालाच वाटत असते. आपण मतदान केलेला उमेदवार निवडून आला, तर आपले मत वाया गेले नाही, हे एक समाधान असते. मतमोजणी सुरू होताच आधी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याविषयीचे कल येण्यास सुरुवात होते. दुपारी दीड दोन वाजेपर्यंत चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागते. तथापि, ते अंतिम निकाल नसतात, हे आधी लक्षात घ्या. जे काय असेल ते असो; परंतु आधी स्वतःची काळजी घ्या, अशी आमची तुम्हाला आग्रहाची विनंती आहे.
कुणीही निवडून आले, तरी आपल्या आयुष्यात फारसा फरक पडत नाही, हे प्रत्येक नागरिकाने समजावून घेणे आवश्यक आहे. रोजच्यासारखा निवांत चहा घ्या, नाश्ता करा, भरपूर पाणी प्या. आपल्याला बीपी, डायबिटीस, थायरॉईड इत्यादी गोळ्या असतील, तर त्या वेळच्या वेळेवर घ्या. काही निकाल धक्कादायक असतील; परंतु त्याचा धक्का आपल्याला बसणार नाही, याची काळजी जरूर घ्या. याबाबतीत दगडाचे काळीज असणार्या राजकीय लोकांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. परिस्थिती कशीही आणि कितीही बिकट असली, तरी त्यातून मार्ग काढण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यांना धक्का-बिक्का अजिबात बसत नाही. साधारण दुपारी तीननंतर, म्हणजे कुणाचे किती आमदार निवडून येण्याची शक्यता आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाटाघाटी सुरू होणार आहेत. विविध राजकीय पक्षांच्या या आपापसातील वाटाघाटी अत्यंत तणावपूर्ण असतात आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नेता आपलेच घोडे दामटण्याचा प्रयत्न करत असतो. शांत राहा, स्थिर राहा, स्थितप्रज्ञ राहा आणि जे जे आपल्यासमोर येईल ते तटस्थपणे स्वीकारण्यास सुरुवात करा.
आपल्या मनासारखे निकाल लागले नाही, तर विनाकारण ईव्हीएमच्या नावे खडे फोडत बसू नका. ईव्हीएमला नावे ठेवणे हे ओल्ड फॅशन झाले आहे. त्यापेक्षा आहे तो निकाल स्वीकारण्याची मानसिक तयारी ठेवा म्हणजे तुम्हाला कुठलाही धक्का बसणार नाही.वाढलेली टक्केवारी कोणाला उपयोगाची होती? किंवा लाडक्या बहिणींनी सरकारला खरेच मतदान केले की नाही? यावरून आपल्या घरातील सदस्यांशी किंवा मित्रांशी अजिबात वाद घालू नका. जे व्हायचे ते होऊन गेले आहे. येणार्या काही दिवसांत ‘पाठीत खंजीर खुपसला’, ‘कात्रजचा घाट दाखवला’, ‘लोकशाहीचा गळा घोटाळा’ अशी वाक्ये कानावर पडतील. त्याकडे साफ दुर्लक्ष करा. आता केवळ निकाल बाकी आहेत, एवढे लक्षात ठेवले, तरी काळीज धडधडणार नाही. सरकारे येत असतात आणि जात असतात. आपण आपले शांत राहावे. कारण, आपले आरोग्य आपल्यासाठी महत्त्वाचे असते. फार फार तर काय होईल याचा विचार करा. मुख्यमंत्रिपदावर एकमत झाले नाही, तर चर्चेची गुर्हाळे सुरू राहतील आणि दरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवटी लागू होईल, अशी शक्यता आहे. यथावकाश काही गट गुवाहाटी, बंगळूर, उटी किंवा गंगटोकला जाऊन येतील. विशिष्ट वेळी काही ना काही समीकरण तयार होऊन कोणी ना कोणीतरी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार समोर येईल.