नाव आझाद मैदान आणि व्यासपीठावर सगळे मोदींचे गुलाम! मिंध्यांवर संजय राऊत बरसले

2 hours ago 1

शिवसेनेच्या अति विराट दसरा मेळाव्यात उपस्थित शिवसैनिकांसमोर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नेहमी प्रमाणेच तडाखेबंद भाषण केलं. शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय राऊत यांनी मिंधेंच्या मेळाव्यावरून तुफान टीका करत त्यांच्या गटाचा जन्म सुरत मध्ये झाला असून तिथेच मेळावा घ्या, अशी टीका केली. तसेच आझाद मैदानात सुरू असेलल्या मिंधे गटाच्या मेळाव्याला लक्ष्य करताना ‘नाव आझाद मैदान आणि व्यासपीठावर सगळे मोदींचे गुलाम’, अशा शब्दात अक्षरश: सालटी काढली.

यंदा प्रथमच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचं शिवतीर्थावर भाषण झालं. त्याचा उल्लेख करत ‘आदित्य ठाकरे यांचं भाषण ही शिवसेनेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे’, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. ‘आता आपण लहान मुलगे राहिलेले नाहीत. देशाचे राज्याचे मोठे नेते झाला आहात हा देश फार अपेक्षेने त्यांच्याकडे पाहात आहे’, असं संजय राऊत म्हणाले.

या मशालीला सुद्धा यापुढे शस्त्राचा दर्जा द्यावा लागेल!

या देशात अनेक शस्त्र आहेत. विविध शस्त्रांची पूजा येथे केली जाते. नागपूर येथेही सकाळी शस्त्र पूजा झाली. आपण इथे शस्त्र पूजा करत आहोत. आता आमच्या शस्त्रात नवीन शस्त्र आलं आहे ते शस्त्र म्हणजे मशाल. या मशालीला सुद्धा यापुढे शस्त्राचा दर्जा द्यावा लागेल अशा प्रकारचं हे शस्त्र आमच्या हाती आली आहे. एक चिंगारी काफी है मशाल जलाने के लिए, और एक मशाल ही काफी है ज्वालामुखी उठाने के लिए। ही सगळी ज्वालीमुखी आज शिवतीर्थावर धगधगताना दिसते आहे. या मशाली पेटलेल्या आहेत, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

‘हा निष्ठावंताचा महाराष्ट्र आहे. हा स्वाभिमान्यांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा हा महाराष्ट्र आहे. त्याच निष्ठावंतांचा हा विराट मेळावा आख्खा देश पाहतो आहे’, असंही त्यांनी सांगितलं.

जेव्हा जेव्हा ठाकऱ्यांच्या तीन पिढ्यांनी महाराष्ट्राला लढण्याचे आव्हान केलं तेव्हा तेव्हा हा महाराष्ट्र त्यांच्या पाठी मागे लढायला उभा राहिला आहे. मला असं वाटतं की मशालीसारखं दुसरं कोणतं चिन्हं नाही. मशाल ही ENEMY OF DARK आहे. हा जो अंधाकारा महाराष्ट्रात देशात पसरला आहे तो दूर करण्यासाठी मशाल हवी, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

टाटा आणि ठाकरे विश्वासाचं दुसरं नाव!

उद्योगपची रतन टाटा यांच्या निधनाच्या वृत्ताचा धागा पकडत संजय राऊत यांनी दोन घराण्यांमधील साम्य दाखवलं. ‘दोन दिवसांपूर्वी आपल्या देशाचे सुपुत्र रतन टाटा यांचे निधन झालं. उद्योगपती गेल्यावर देश हळहळत नाही करण उद्योगपती सामान्यांना आपले वाटत नाही. पण टाटा गेल्यावर संपूर्ण देश हळहळला कारण गेली अनेक शतकं टाटा म्हणजे विश्वास होता. विश्वासाचं दुसरं नाव ठाकरे आहे. हे लक्षात घ्या. विश्वास म्हणून हा महाराष्ट्र इतक्या वादळात ठाकऱ्यांच्या मागे उभा राहिला’, असं संजय राऊत यांनी ठामपणे सांगितलं.

नाव आझाद मैदान आणि व्यासपीठावर सगळे मोदींचे गुलाम…

‘ही देवाची आळंदी आहे. चोरांची आळंदी आझाद मैदानात भरलेली आहे. नाव आझाद मैदान आणि व्यासपीठावर सगळे मोदींचे गुलाम आहेत. आझाद मैदानाची तर लाज ठेवा. गुलामांचा मेळावा आझाद मैदानावर. शिवतीर्थावरील मेळाव्याला 50 – 55 वर्ष झाली. माननीय शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलेला हा मेळावा आहे. तिकडे आझाद मैदानावर मेळावा घेणाऱ्यांनी तो मेळावा सुरत, गुजरातला घ्यायला हवा होता. कारण त्यांच्या पक्षाचा जन्म शिवतीर्थावरून झाला नसून सुरतच्या गर्भातून झाला होता. आपलं जेव्हा दोन महिन्यांनी सरकार आलं की सांगू तो पर्यंत जीवंत राहिला, वाचलात तर तुमचा मेळावा हा सुरतला घ्या. ते तुमचं जन्मस्थान आहे. महाराष्ट्र नाही, अशा सणसणीत शब्दात त्यांनी मिंध्यांवर जबरदस्त हल्लाबोल केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article