Published on
:
22 Nov 2024, 11:51 pm
Updated on
:
22 Nov 2024, 11:51 pm
बर्लिन : एलियन म्हणजेच परग्रहवासीयांचे अस्तित्व आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण तसे अनेक दावे केले जात असतात. विशेषतः मंगळावरील काही छायाचित्रे पाहून अनेक ‘एलियनवादी’ लोक असे दावे करतात. आताही मंगळावरील एका छायाचित्रात मानवाकृती दगड दिसला आहे व त्यावरून एक भन्नाट दावा करण्यात आला आहे. 50 वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर एक एलियन सापडला होता. मात्र,‘नासा’च्या चुकीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
बर्लिन टेक्निकल युनिव्हर्सिटीमधील एका वैज्ञानिकाने हा दावा केला आहे. बर्लिन टेक्निकल युनिव्हर्सिटीचे डर्क शुल्झे-माकुच यांनी केलेल्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेताना ‘नासा’ या अंतराळ संस्थेने एक प्रयोग केला होता. या प्रयोगादरम्यानच एलियनचा मृत्यू झाल्याचा दावा डर्क शुल्झे-माकुच यांनी केला आहे. ‘नासा’च्या प्रयोगाबाबतची सविस्तर माहिती डर्क शुल्झे-माकुच यांनी दिली. तसेच ‘नासा’च्या चुकीमुळे कशा प्रकारे एलियनचा मृत्यू झाला हे देखील पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. 1970 साला दरम्यान नासाने मंगळ ग्रहावर वायकिंग मिशन राबवले होते. नासाच्या वायकिंग मोहिमेअंतर्गत दोन लँडर मंगळ ग्रहावर उतरले होते. 20 जुलै 1976 रोजी वायकिंग 1 तर, 3 सप्टेंबर 1976 रोजी वायकिंग 2 हे मंगळावर उतरले होते. मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या उद्देशानेच नासाने वायकिंग मिशन राबवले. या प्रयोगाचा एक भाग म्हणून मंगळावरील मातीत पाणी मिसळण्यात आले. तसेच कार्बन मोनोऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड वायूच्या मदतीने देखील मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळ ग्रहावर कोणत्याही प्रकारचे वातावरण नाही. येथील एलियन हे पाण्याशिवाय जिवंत राहत होते. नासाच्या प्रयोगादरम्यान मंगळ ग्रहावर कार्बन मोनोऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड वायूचे रिएक्शन होऊन ‘हिच-हायकर्स’च्या संसर्गामुळे एलियनचा मृत्यू झाल्याचा दावा डर्क शुल्झे-माकुच यांनी केला आहे. वायकिंग 1 आणि वायकिंग 2 हे सध्या सक्रिय नाहीत. मात्र, त्यांचे अवशेष मंगळ ग्रहावर आहेत. मंगळ ग्रहावर जगण्यासाठी पाण्याची गरज नाही, असा एक निष्कर्ष काढला जात आहे. चिलीच्या अत्यंत कोरड्या अटाकामा वाळवंटात आढळणार्या सूक्ष्मजीवांप्रमाणेच मंगळग्रहावर सजीवांचे अस्तित्व असू शकते. नासाच्या वायकिंग लँडरने चुकून मंगळावर जास्त पाणी टाकून जीवसृष्टी नष्ट केल्याचा हा दावा केला जात आहे.