निवडणुकीवरील सोनाळा ग्रामस्थांचा बहिष्कार मागे:पुलाचा प्रश्न मार्गी लागणार; जि.प. बांधकाम विभागाने दिले पत्र
1 day ago
1
कमी उंचीच्या पुलाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने बाळापूर तालुक्यातील सोनाळा ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेतला आहे. पुलाच्या कामाबाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ग्रामस्थांना पत्र दिले असून, कामाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयामार्फत हे काम करण्यात येईल, असे पत्रात नमूद केले आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विष्णू अरबट व सरपंच माधुरी अमझरे यांनी जि.प. व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र दिले असून, यात बहिष्कार मागे घेण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुलाची उंची कमी आहे. पावसाळ्यात हे पूल पाण्याखाली जातात. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटतो. याचा सर्वाधिक फटका रुग्ण व विद्यार्थ्यांना बसतो. रुग्णास तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईक-परिचितांना प्रचंड कसरत करावी लागते. अनेक पूल तर कालबाह्य झाले आहेत. दरम्यान आता बाळापूर मतदारसंघातील सोनाळा परिसरातील पुलाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पुलाबाबत आंदोलन केल्यानंतरही सरकारने दखल घेतली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यामुळे गावातील नागरिक निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (निवडणूक) महेश परंडेकर यांना सादर केलेल्या निवेदनात दिला होता. पुलाची उंची अत्यंत कमी सोनाळा गावाजवळून मोर्णा नदी वाहते. या ठिकाणच्या पुलाची उंची अत्यंत कमी आहे. त्यामुळे गावासह या मार्गावरील परिसरातील गावातील प्रवाशांना पावसाळ्यात जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करावा लागतो. याबाबत ग्रामस्थांनी अनेक संबंधित विभागाशी वारंवार संपर्क साधला. या पुलाची उंची वाढवण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र या मागणीकडे प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला होता.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)