आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार चांगलाच वधारला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1961 अंकांनी वाढून 79 हजार 117 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 763 अंकांनी वधारून 23,907 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 30 शेअर्स फायद्यात राहिले. सेन्सेक्सच्या टॉपमध्ये एसबीआय, टीसीएस, टायटन, आयटीसी, इन्फोसिस, एलअँडटीचे शेअर्स सर्वात जास्त फायदेशीर ठरले, तर निफ्टीतील 50 शेअर्सपैकी 49 शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली. केवळ एका शेअरमध्ये घसरण दिसली. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटी आणि टेक शेअर्स ब्लू चिप शेअर्समध्ये मोठी खरेदीदारी दिसली. लाच दिल्याप्रकरणी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेकडून अटक वॉरंट जारी झाल्यानंतर अदानी समूहाचे अनेक शेअर्स घसरले होते, परंतु शुक्रवारी या शेअर्समध्ये वाढ दिसली.
आयटी सेक्टरमध्ये बंपर खरेदी
अमेरिकी लेबर मार्केट डेटा जारी झाल्यानंतर आयटी शेअर्समध्ये बंपर खरेदी पाहायला मिळाली. यामुळे आयटी इंडेक्स 3.29 टक्के वाढून 43,332 च्या लेवलवर बंद झाले. निफ्टी ऑटो 1.76 टक्क्यांनी मजबूत होऊन 23,554 च्या लेवलवर बंद झाले.