Published on
:
22 Sep 2024, 10:25 am
Updated on
:
22 Sep 2024, 10:25 am
परभणी : बालरंगभूमी परिषदेच्या येथील शाखेच्या वतीने रविवारी (दि.२२) लोककला महोत्सवाचे आयोजन सकाळी १० वाजता वैष्णवी मंगल कार्यालयात करण्यात आले असून जल्लोष लोककलेचा या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री निलम शिर्के सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहील. महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी माजी महापौर प्रताप देशमुख हे आहेत.
बाल रंगभूमी परिषद मुंबई व स्थानिक शाखेच्या वतीने आयोजित या महोत्सवात व्यासपिठाला गोंधळ महर्षी राजाराम बापु कदम यांचे नाव देण्यात आले आहे. बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा निलम शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीसह माजी महापौर प्रताप देशमुख, डॉ. संप्रिया पाटील, प्रा. डॉ. संध्या दुधगावकर, मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, उपाध्यक्षा शैलेश गोजमगुंडे, सहकार्यवाह असिफ अन्सारी, अनंत जोशी, पत्रकार संतोष धारासूरकर, अनिकेत सराफ आदींची उपस्थिती राहणार आहे.
या महोत्सवात ५०० पेक्षा जास्त बाल कलावंत सहभागी होवुन कलेचे सादरीकरण करणार आहेत. यात एकलवादन, एकलनृत्त्य, एकल गायनासह समूह गायन व समूह नृत्य प्रकार सादर होणार आहे. अशी माहिती परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबा ढोले, उपाध्यक्ष प्रा. नितीन लोहट, कार्याध्यक्ष उपेंद्र दुधगावकर यांनी दिली.