Published on
:
23 Nov 2024, 12:04 am
Updated on
:
23 Nov 2024, 12:04 am
पिलीव : पिलीव (ता. माळशिरस) परिसरात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाळा संपला तरी ओढे, नाले, बंधारे, तलाव कोरडेच आहेत. गेली तीन वर्षे मोठा पाऊस पडला नसल्याने परिसरातील ओढ्याला पाणी आले नाही. त्यामुळे दुष्काळाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे. पडलेल्या पावसाच्या ओलीवर पेरलेल्या रब्बीची पिके जळून जाऊ लागली आहेत.
नव्याने करावयाच्या पेरणीसाठी पाऊस पडला नसल्याने परिसरातील पेरण्या रखडल्या आहेत. सध्या गहू व हरभरासारख्या पिकाला वातावरण अनुकूल आहे. मात्र विहिरींना पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने पेरलेल्या रब्बीच्या पिकांना व ऊस वाचविण्यासाठी पाणी कमी पडू लागले आहे. नीरा उजवा कालव्याला अद्याप पाणी सुटले नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.
या भागात पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, पडलेल्या पावसाने पेरलेल्या रब्बी पिकाला व पेरणी करावयाच्या पिकासाठी पाणी कमी पडत असल्याने सुळेवाडी गावावर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहीर, तलाव, ओढे, नाले, बंधारे कोरडे पडल्याने मेंढपाळ स्थलांतर करू लागले आहेत. थोड्याच दिवसांत टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्याच पद्धतीने बचेरी गावाला काही दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे.
गावाला पाणीपुरवठा करणार्या विहिरीमध्ये पिलीव येथून पाईपलाईनद्वारे आणलेल्या पाण्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला आहे, अशी माहिती सरपंच राणी गोरड यांनी दिली. त्याचप्रमाणे शिंगोर्णी गावाला पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. याठिकाणीही थोड्याच दिवसांत माणसांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाला टँकर सुरू करावे लागणार असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे. अल्प प्रमाणात पडलेल्या पावसामुळे पेरलेली पिके जळून जाऊ लागले आहेत. त्यामुळे कामगारांना, मजुरांना काम नसल्याने ते मजूर, ऊसतोड कामगार वीटभट्ट्याचे काम करण्यासाठी वसई, मुंबईसारख्या ठिकाणी स्थलांतर करू लागले आहेत. या गावातील स्थलांतर थांबवण्यासाठी या गावांना नीरा देवधर प्रकल्पाचे शेतीसाठी व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची सोय करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.