मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Published on
:
07 Feb 2025, 7:05 pm
Updated on
:
07 Feb 2025, 7:05 pm
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरीही त्यातून मार्ग काढला. अफजल खान दगाबाज आहे, तो घातपात करेल, हे माहीत असूनही महाराजांनी त्याची भेट घेतली. व वाघनखांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला. शिवाजी महाराज १४ वर्षाचे असताना अठरापगड जातींच्या सोबतीने मोठी फौज तयार केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कशी राखायची, हे महाराजानीच शिकवले. प्रत्येकांच्या जीवनात महाराजांनी काहीतरी दिले आहे, असे प्रतिपादन शुक्रवारी (दि.७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मध्यवर्ती संग्रहालय अजब बंगला येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन आणि टपाल तिकिटाचे उद्घाटन झाले. यानंतर रेशीम बागेतील सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ढोलताशा पथक, वारकरी असे महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन लक्षवेधी होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राजे मुधोजी भोसले प्रामुख्याने उपस्थित होते. शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्या वाघ नखाचा वापर केला. ती वाघ नख सुधीर मुनगंटीवार आणि राज्य सरकारमुळे महाराष्ट्रात आली. यासोबत शिवकालीन शस्त्र आता आपल्या नागपुरच्या संग्रहालयात आली आहेत, यावर त्यांनी भर दिला. टपाल विभागाने वाघ नखाविषयीचे तिकीट काढले आहे. सांस्कृतिक विभागाने विदर्भातील तरुणाई हे प्रदर्शन पाहण्यास कशी येऊ शकेल अशी सोय करावी, असे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले.