Published on
:
28 Nov 2024, 9:31 am
Updated on
:
28 Nov 2024, 9:31 am
वाहतूक नियम धुडाकाविणार्या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत पोलिसांनी नियमभंग करणार्या 35 हजारांहून जास्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. त्यामध्ये विरुद्ध दिशेने वाहने चालविणारे (राँग साइड) दुचाकीस्वार, मोटारचालकांविरुद्ध कारवाई तीव— केली आहे. विरुद्ध दिशेने वाहने चालविण्याचे प्रमाण मोठे असून, अशा प्रकारच्या बेदरकारपणामुळे गंभीर स्वरूपाच्या अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत पोलिसांनी विरुद्ध दिशेने वाहन चालविणार्या 30 हजार 927 वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. एकाच दुचाकीवरून तिघांनी प्रवास केल्यास (ट्रिपल सीट) त्यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे. ट्रिपल सीट वाहने चालविणार्या तीन हजार 341 वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे, तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणार्या 634 वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली
दररोज रात्री 27 ठिकाणी नाकाबंदी
मद्यप्राशन करून वाहने चालविणार्या तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी दररोज रात्री नाकाबंदी करण्यात येत आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी 27 ठिकाणे निश्चित केली असून, कारवाईसाठी सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात गंभीर स्वरूपांचे अपघाताचे प्रमाण जास्त आहे. वाहतूक पोलिस दिवसभरात दोन सत्रात काम करतात. वाहतूक शाखेतील 850 पोलिस कर्मचारी दोन सत्रात विविध चौकांत वाहतूक नियमन करतात. वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर अपघात घडतात. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. शहरात गंभीर अपघातात दररोज दोन ते तीन गंभीर अपघात घडतात, असे निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदविले आहे.
सहा महिन्यांसाठी वाहन होणार जप्त
कारवाई करूनही वाहनचालक सर्रास वाहतूक नियमभंग करत असल्याचे दिसून आले. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मोबाईलवर बोलणे एकाच दुचाकींवरून तिघांचा प्रवास (ट्रिपल सीट), मद्य पिऊन वाहन चालविणे, मोटार चालविताना सीट बेल्ट न लावणे अशा प्रकारचे नियमभंग सर्रास केले जातात. बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविताना आढळून आल्यास वाहनचालकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, तसेच सहा महिन्यांसाठी वाहन जप्त करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
वाहतूक नियभभंग करणार्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई तीव— करण्यात आली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणार्या अडीच हजार जणांंविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात 500 जणांचा वाहतूक परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविला आहे. संबंधित वाहनचालकांंचे परवाने किमान सहा महिन्यांंपर्यंत निलंबित होणार असल्याने त्यांना वाहन चालविण्यास बंदी असणार आहे.
अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा