कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पाचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा टेम्पा समोर चाललेल्या बसवर जोरदार आदळला. त्यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस 20 फूट दरीत कोसळली. या बसमधून 11 प्रवासी प्रवास करीत होते, ते सर्वच बालबाल बचावले. ही दुर्घटना मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात आज पहाटे घडली. या अपघातात टेम्पोमधील तिघे जण जखमी झाले असून त्यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सांगोला येथून मुंबईच्या दिशेने येत असलेली अरुण ट्रॅव्हलची बस आज पहाटे 3 च्या सुमारास बोरघाटात आली. ढेकू गावाच्या परिसरात ही बस एका उतारावर असताना पाठीमागून येत असलेल्या कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे टेम्पोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो बसवर जोरात आदळला. परिणामी बसचालक एम. रविचंद्रन यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या 20 फूट दरीत कोसळली. सुदैवाने बसचा वेग कमी असल्यामुळे बसमधून प्रवास करणारे 11 प्रवासी बालबाल बचावले.
बसमधील भाऊसाहेब कदम (42), इंद्रजीत काशीद (9), स्मिता माने (45), आक्काताई काशीद (55), सुभाष काशीद (42) हे किरकोळ जखमी झाले. त्यांना नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून सोडून दिले. या अपघातात टेम्पोमधील शाहिद मोहम्मद, इरफान अयुब खान आणि कैफ शेख मोहम्मद इनामदार यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
ट्रकवर बस आदळली
बोरघाटात बस पलटी झाल्याच्या दुर्घटनेनंतर काही तासात दुसरी दुर्घटना बोरघाटात नवीन बोगद्याच्या परिसरात घडली. कर्नाटक येथून मुंबईच्या दिशेने निघालेली बस खोपोली बासपासजवळ आली असता उतारावर बसचालक मंजुनाथ चन्नाबसप्पा यांचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही बस तिसऱ्या लेनने समोर चालणाऱ्या ट्रकवर पाठीमागून जोरदार आदळली. त्यानंतर ही बस बोगद्याच्या भिंतीला घासली. या अपघातात बसमधील तीन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. जखमी प्रवाशांवर आयआरबीच्या अॅम्ब्युलन्समध्ये घटनास्थळी उपचार करण्यात आले. बसमधून प्रवास करणाऱ्या 20 प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.