भाजपची अशोक चव्हाणांना उमेदवारी?:प्रताप चिखलीकरांचेही नाव चर्चेत, ऐनवेळी होणार नावाची घोषणा; पोटनिवडणुकीची रंगत वाढणार

2 hours ago 1
नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबतच होणार आहे. काँग्रेसने येथून दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. आता त्यांच्याविरोधात भाजपने थेट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उतरवण्याची रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण अशोक चव्हाण सध्या आपल्या मुलीच्या प्रचारात व्यस्त असल्यामुळे त्यांचा ही निवडणूक लढवण्याचा कोणताही विचार नाही असे सांगितले जात आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसने या ठिकाणी वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. यासंबंधीचा अधिकृत निर्णय बुधवारी जाहीर झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी नांदेड येथून लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर आता भाजपने येथून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. यामुळे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. चव्हाण, चिखलीकर यांचा अनुत्साह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सध्या राज्यसभेवर आहेत. येथील उमेदवारीसाठी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. पण अशोक चव्हाण यांनी सध्या आपल्या मुलीच्या प्रचारासाठी भोकर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. तर प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. ते पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लोहा - कंधार विधानसभेतून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते पोटनिवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचा दावा केला जात आहे. पण ऐनवेळी चव्हाण किंवा चिखलीकर या दोघांपैकी एकाच्या नावाची घोषणा होणार हे जवळपास फिक्स असल्याचे मानले जात आहे. याशिवाय माजी आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे, मारोतराव कवळे गुरूजी, राजेश कुंटूंरकर यांच्याही नावाची या प्रकरणी चर्चा आहे. लोकसभेला झाली होती मोठी उलथापालथ उल्लेखनीय बाब म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नांदेडच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे काँग्रेससाठी नांदेडमध्ये विजय मिळवणे जवळपास अशक्यप्राय वाटत होते. पण वसंतराव चव्हाण व काँग्रेसच्या येथील जुन्या चेहऱ्यांनी स्वतःचे राजकीय कसब दाखवत विजयश्री खेचून आणली. वसंतरावांनी भाजप उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा दारुण पराभव केला. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. तर या विजयामुळे काँग्रेसला जिल्ह्यात पुन्हा उभारी मिळाली होती. पण दुर्दैवाने वसंतराव चव्हाण यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे येथे लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article