भाविकांना तब्बल 35 पोत्यांचा भाकरी-ठेच्याचा महाप्रसाद:काळेगाव येथील नवरात्रोत्सवात कानिफनाथ संस्थानची तीन दशकांपासूनची परंपरा कायम

4 days ago 3
तालुक्यातील काळेगाव येथील श्री कानिफनाथ संस्थानमध्ये तीन दशकांपासून नवरात्रोत्सवात आठ दिवस कळण्याची भाकरी व हिरव्या मिरचीच्या ठेच्याचा महाप्रसाद वितरणाचा उपक्रम दानदात्यांच्या आर्थिक मदतीतून व संस्थानच्या वतीने राबविण्यात येत आहे. अशा प्रकारच्या महाप्रसादाचे वितरण करणारे विदर्भातील हे एकमेव संस्थान असल्याचे सांगितले जात आहे. या संस्थानच्या वतीने यंदा ३० पोते ज्वारी, ५ पोते उडीद, ११ क्विंटल हिरवी मिरची, ७ क्विंटल टमाटे, ५ क्विंटल तेल महाप्रसाद बनविण्यासाठी लागले. नवमीच्या दिवशी भाविकांना शिरा, पोळी व पातोड्याच्या भाजीचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे सहसचिव रामेश्वर राहाणे यांनी दिली. काळेगाव येथील नवनाथाचे हे पुरातन मंदीर आहे. सुरुवातीला हे मंदीर चुना व दगडांपासून बांधण्यात आले होते. सन् १९९२ मध्ये ग्रामस्थांच्या माध्यमातून या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला. सद्य:स्थितीत या मंदिराचे स्वरूप भव्य आहे. या मंदिरात नित्यनेमाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवरात्रीत या ठिकाणी यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. नवरात्रीत पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांची गर्दी असते. काळेगावपासून दक्षिणेस तीन किलोमीटर अंतरावर दोन उंच डोंगर आहेत. या डोंगरांच्या मध्यभागी त्रिशुलाच्या आकारासारखा निसर्गरम्य परिसर आहे. हा परिसर कानिफनाथ गड म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी आता मंदीर उभारण्यात आले आहे. या मंदिरात संगमरवरी दगडापासून तयार करण्यात आलेल्या श्री कानिफनाथांची तीन फुटांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. या संस्थानला राज्य सरकारकडून "क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त आहे. माहेरवासीणींचा उत्सवात घेतला सहभाग काळेगावसह परिसरातील माहेर असलेल्या महिला नवरात्रोत्सवाच्या काळात माहेरी येतात. या उत्सवात सहभागी होऊन त्या महाप्रसाद बनविण्यास हातभार लावतात. कोणताही स्वार्थ भाव न ठेवता गावातील महिला-पुरुष महाप्रसाद बनविण्यासाठी केवळ सेवाभाव ठेऊन पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत सेवा देतात.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article