पिंपरी-चिंचवड महापालिका बरखास्त होऊन पावणेतीन वर्षे झाली आहेत. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका पार पडल्याने आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका होतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. लवकरच महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजेल, असा विश्वास महायुतीच्या पदाधिकार्यांकडून व्यक्त केला जात आहे.फेब्रुवारी 2017 ला महापालिकेची निवडणूक झाली. भाजपने प्रथमच महापालिकेत सत्ता स्थापन केली. या पंचवार्षिकेचा कार्यकाळ 12 मार्च 2022 ला संपला. त्या दिवसांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. आयुक्त प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. कोरोना महामारी, ओबीसी आरक्षण, प्रभाग सदस्यसंख्या आदी विविध कारणांमुळे तसेच, न्यायालयीन प्रक्रियेमुळे या निवडणुका रखडल्या आहेत. परिणामी, कामे होत नसल्याची ओरड कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. पिंपरी-चिंचचवडसह राज्यभरातील बहुतांश महापालिकेच्या निवडणुका होत नसल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. रखडलेल्या निवडणुका तातडीने घेण्याबाबत कार्यकर्त्यांकडून दबाव वाढला आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेची निवडणूक घेतली जाईल, असे सांगत वरिष्ठांनी दोन्ही निवडणुकीत माजी नगरसेवक, इच्छुक तसेच, कार्यकर्त्यांकडून पक्षाचा प्रचार करून घेतला. महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळेल, या आशेवर कार्यकर्ते व इच्छुकांनी जीव तोडून पक्षाच्या उमेदवारांचे काम केले. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. राज्यात महायुतीचे सरकार आल्याने महापालिका निवडणुका तातडीने लागतील, अशा विश्वास महायुतीच्या पदाधिकार्यांकडून व्यक्त केला जात आहे.
फेब्रुवारी 2017 मध्ये चारसदस्यीय प्रभागरचनेनुसार निवडणुका घेण्यात आल्या होता. त्या प्रभागरचनेनुसार निवडणुका घेण्यास महायुतीचे नियोजन आहे. त्यामुळे नव्याने प्रभागरचना करावी लागणार नाही; मात्र पुणे महापालिकेत काही नव्या भागांचा समावेश झाल्याने नव्याने प्रभागरचना करावी लागणार आहे. सदस्यसंख्येवरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विधानसभेला मोठा विजय मिळाल्याने राज्यभरात महायुतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या लाभ उठविण्यासाठी राज्य सरकार महापालिका निवडणुका घेण्यासाठी सकारात्मक आहे, असे भाजपच्या पदाधिकार्यांनी सांगितले. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर लवकरच निवडणुका होतील, असा दावा केला जात आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीने प्रचंड विजय मिळविला आहे. मावळ लोकसभेला तसेच, चिंचवड, भोसरी व पिंपरीत महायुतीने घसघशीत यश प्राप्त केले आहे. लवकरच महापालिका निवडणुका होतील. त्या निवडणुकीतही भाजपा आणि महायुती मोठे यश मिळवून पुन्हा सत्ता गाजविले, असा विश्वास भाजपाचे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी व्यक्त केला आहे.
मार्चपूर्वी महापालिका निवडणुका होतील
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले आहे. संपूर्ण राज्यात महायुतीसाठी उत्तम वातावरण आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक मार्च 2025 अगोदर घेतल्या जातील. त्याबाबत यापूर्वीच अजित पवार यांनी तसे संकेत दिले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले.