डोंबिवली पाईपलाईन महामार्गावरील धामटण येथे चाळींना संरक्षण भिंतीत लपवून उद्योग चालवले जात आहेत.Pudhari News network
Published on
:
27 Nov 2024, 11:37 am
Updated on
:
27 Nov 2024, 11:37 am
नेवाळी : प्रदूषणकारी कारखान्यांनी आता नेवाळीमधील चाळींत थेट बस्तान मांडले असून या कारखान्यांनी येथील चाळींमध्ये आश्रय घेतला आहे. डोंबिवली पाईपलाईन महामार्गावरील धामटण येथे चाळींना संरक्षण भिंतीत लपवून उद्योग सुरू झाले आहेत. उघड्यावर सोडण्यात येणारे दूषित पाणी परिसरासाठी घातक आहे. त्यामुळे परिसराची प्रदूषणाने हानी होण्याआधी कारखाने बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे.
उल्हासनगर शहरातील नदी प्रदूषणास कारणीभूत ठरलेले जीन्स कारखाने सर्वोच्च न्यायालयाने बंद केले होते. कारखाने शहरात बंद झाल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागात आश्रय घेण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यांवर देखील धडक कारवाई सुरू झाल्याने आता चाळींचा आधार कारखाना मालकांनी घेण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणात चाळींमध्ये कारखाने सुरू करून उघड्यावर दूषित पाणी सोडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. शहरातून ग्रामीण भागात स्थलांतर झालेल्या या कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण महामंडळ समाधानकारक कारवाई करत नसल्याने त्यांचे चांगलेच फावले आहे. मलंगगड पट्ट्यात असलेले कारखाने तत्कालीन तहसीलदार प्रशांती माने यांनी बुलडोझर लावून जमीनदोस्त केले होते. महसूल विभागाने हाती घेतलेली कारवाई प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घेणे गरजेच झाले आहे. कारखान्यांवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत कारखाना मालक अश्याच पद्धतीने उघड्यावर दूषित पाणी सोडणार आहेत. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळाला कधी कारवाईला मुहूर्त मिळतोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
प्रचंड दुर्गंधीचे साम्राज्य
नेवाळी परिसरात असलेल्या धामटण परिसरात नाले व एमआयडीसीची गटार देखील आहेत. कारखान्यातील दूषित पाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता उघड्यावर सोडले जात आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चाळींच्या परिसरात नागरिकांना मोठा त्रास होत असल्याने अनेकांनी घर सोडून परिसरातून स्थलांतर करून घेतले आहे.
नागरिकांसह वन्यजीवांच्या जीविताशी खेळणार्या जीन्स कारखान्यांवर कारवाईचा मुहूर्त प्रदूषण नियंत्रण महामंडळाला कधी मिळणार, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
येथील कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. येथे घरे घेतलेले लोक घरे विकून निघून गेली आहेत. आता सुद्धा उघड्यावर दूषित पाणी सोडले असल्याने एमआयडीसीची गटारे तसेच मोकळ्या जागेत दूषित पाणीच दिसून येत आहे. त्यामुळे सदर भागाकडे प्रदूषण नियंत्रण महामंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे.
लक्ष्मी तिवारी, नागरिक