Published on
:
27 Nov 2024, 1:17 pm
Updated on
:
27 Nov 2024, 1:17 pm
नवी दिल्ली : महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी कोण होणार मुख्यमंत्री, या प्रश्नाचे उत्तर अजून सापडले नाही. असे असताना अखिल भारतीय मराठा महासंघाने देवेंद्र फडणवीस यांना आपला पाठिंबा जाहीर केला. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजासह शेतकरी, वारकरी आणि सगळ्या घटकांचे समर्थन आहे, असेही मराठा महासंघाने म्हटले.
मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी दिल्लीत 'पुढारी'शी संवाद साधला. यावेळी संभाजी दहातोंडे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. देवेंद्र फडणवीस यांनी सारथी सारखी संस्था उभी केली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला ताकद दिली. देवेंद्र फडणवीस यांनी कधी जातीभेद केला नाही. केवळ प्रस्थापित मराठा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहेत. मात्र ९० टक्के मराठा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत. फडणवीस हे राज्यातील लोकप्रिय नेतृत्व असून तेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, याचा पुनरुच्चार दहातोंडे यांनी केला.