Published on
:
27 Nov 2024, 1:26 pm
Updated on
:
27 Nov 2024, 1:26 pm
नवी दिल्ली : सोशल मीडियावर अश्लील सामग्रीला आळा घालण्यासाठी विद्यमान कायदे अधिक कडक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. ज्या देशांतून असा कंटेंट येतो तेथील संस्कृती आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे, असे ते म्हणाले. अश्लील कंटेंट रोखण्यासाठी संसदीय स्थायी समितीने या विषयाकडे लक्ष देऊन कायदा कडक करण्याची गरज आहे.
बुधवारी संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लोकसभा खासदार अरुण गोविल यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वैष्णव यांनी ही माहिती दिली. सोशल मीडियावर अश्लील सामग्रीचा तरुणांवर होणारा परिणाम आणि ते रोखण्याची सरकारची जबाबदारी काय, असा प्रश्न गोविल यांनी उपस्थित केला होता. याला उत्तर देताना वैष्णव म्हणाले की, सोशल मीडियाच्या काळात संपादकीय देखरेख संपली आहे. याआधी प्रेसमधून जे काही छापले जायचे ते योग्य की अयोग्य हे संपादकांकडून तपासले जायचे आणि मग ते माध्यमांसमोर आणले जायचे.
ते म्हणाले की, संपादकीय देखरेख संपल्यामुळे आज सोशल मीडिया हे एकीकडे वृत्तपत्र स्वातंत्र्याचे मोठे माध्यम बनले आहे, पण दुसरीकडे ते अनियंत्रित अभिव्यक्ती आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारचे अश्लील कंटेंट पोस्ट केले जातात. यासाठी सध्याचा कायदा अधिक कडक करण्याची गरज असल्याचे वैष्णव म्हणाले. त्यासाठी आपलेही एकमत हवे आहे, असे ते म्हणाले.