महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीचा निकाल लागताच डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. यावेळी अरोरा यांचा अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरा यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेवरून आता अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी ट्विट करत मिटकरींना फटकारले आहे. तसेच असे भविष्यात न करण्याच कडक दम देखील त्यांना भरला आहे.
अजित पवारांसोबतचा नरेश अरोरा यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले होते. ते ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मात्र नंतर मिटकरी यांनी ते ट्विट डिलीट केले. ”पवार साहेबांच्या खांद्यावर हात ठेवायची कुणाची हिंमत झाली नाही. अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कोण कुठला बाहेरच्या राज्यातला माणूस येतो. त्याची पीआर कंपनी लाँच करण्यासाठी म्हणतो की हे आमचं यश आहे. मग 41 आमदार निवडून आले ते, त्यांचे कार्यकर्ते, बूथ प्रमुख, सोशल मीडिया हे काय झोपत होते का? असे ट्विट मिटकरी यांनी केले होते.
त्यावर बुधवारी पार्थ पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत अमोल मिटकरींना फटकारले आहे. ”हे अत्यंत दुर्दैवी आहे. अमोल मिटकरी हे विधानपरिषदेचे आमदार असूनही त्यांनी डिझाईन बॉक्स आणि नरेश अरोरा यांच्याबाबत पक्षविरोधात भूमिका घेतली आहे. माझा पक्ष आणि माझे वडिल आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार अशा प्रकारच्या अमोल मिटकरी यांच्या कोणत्याही मतांचे समर्थन करत नाही. तसेच त्यांनी अशा प्रकारचे तसेच प्रसारमाध्यमांना चर्चा करता येईल असे कोणतेही वक्तव्य भविष्यात करण्यापासून टाळावे, असे ट्विट पार्थ पवार यांनी केले आहे.