रायगडच्या कर्जत-खालापूरमध्ये महायुतीमधील सुरु असलेली धुसफूस काही केल्या कमी होताना दिसत नाही. कर्जत-खालापूरमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे हे जिंकून आले आहेत. पण महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचं बघायला मिळत आहे. महेंद्र थोरवे यांच्याकडून सुनील तटकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका करण्यात आली होती. त्या टीकेवर अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना आपण महेंद्र थोरवे यांना जास्त महत्त्व देत नसल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना महेंद्र थोरवे यांनी चांगलाच घणाघात केला. “अदिती तटकरे यांच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं”, अशी खोचक टीका महेंद्र थोरवे यांनी केली.
“मी जे काही निवडून आलेलो आहे ते काही काठावर निवडून आलेलो नाही. तुमचे जे काही आमदार निवडून आलेले आहेत ते काठावर निवडून आलेले आहेत. मी 5700 मतांनी निवडुन आलेलो आहे. महायुती असताना सुद्धा राष्ट्रवादीने काही अपक्ष उमेदवार दिले. अशा छुप्या पद्धतीने मला पडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. माझे मताधिक्य जे घटलेलं आहे ते त्या पालकमंत्र्यांना म्हणा, तुमच्या बापाला विचारा, हे तुमच्या बापाचं पाप आहे. माझे मताधिक्य तुमच्या बापामुळे घटलेले आहे. मात्र मी काठावर निवडून आलेलो नाही”, असं महेंद्र थोरवे अदिती तटकरे यांना उद्देशून म्हणाले आहेत. खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे नागरी सत्कार प्रसंगी पत्रकार परिषदेत आमदार थोरवे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्यावर टीका केली.
नेमका वाद काय?
खरंतर महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यातला वाद हा नवा नाही. पण निवडणुकीच्या निकालानंतर थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत टीका केली होती. “सुनील तटकरे महायुतीला लागलेले कॅन्सर, महायुतीचे गद्दार, महायुतीतील नासका कांदा आहेत, त्यांना वेळीच फेकून द्या. अन्यथा महायुती खराब होईल”, अशी खोचक टीका महेंद्र थोरवे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ती टीका अजिती तटकरे यांना जिव्हारी लागली आणि त्यांनी त्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
अदिती तटकरे काय म्हणाल्या होत्या?
“महेंद्र थोरवे हे काठावर वाचलेले आहेत. त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा. कुणाला यश मिळाला तर त्याची हवा डोक्यात जावू द्यायची नसते. उलट नम्रतेने त्याचा स्वीकार करायचा असतो. त्यामुळे ज्यानेत्याने ठरवायचं असतं की, त्याने त्याचं यश डोक्यात किती जावू द्यायचं. कोण कुठला मंत्री होणार हे आमच्या पक्षाचे नेते ठरवतील. ते काही स्थानिक आमदार ठरवत नसतात. ते काठावर आहेत. जरा इथे-तिथे झालं असतं तर त्यांना जागा कळली असती”, अशी खोचक टीका अदिती तटकरे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला महेंद्र थोरवे यांनी प्रत्युत्तर दिलं.