मुंबईत यंदा जानेवारीतील कमाल तापमानाने ’सरासरी’ पातळी ओलांडतानाच 33.2 अंशांचा नवीन उच्चांक गाठला. यापूर्वी जानेवारी 2009 मध्ये 32.9 अंश इतक्या सरासरी कमाल तापमानाचा विक्रम नोंद झाला होता. जानेवारी महिन्यात सरासरी कमाल तापमान 31.2 अंश इतके असते. मात्र गेल्या महिनाभरातील कमाल तापमानाने 15 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. दिवसभरातील विक्रमी तापमानाच्या लाहीलाहीने त्रासलेल्या मुंबईकरांना रात्रीच्या गारव्याने दिलासा दिला.
मुंबई शहर आणि उपनगरांत रात्री हवेत गारवा असतो. त्यामुळे मागील दोन आठवडयांपासून शहरातील किमान तापमान 20 अंशांच्या खाली नोंद होत आहे. मात्र याचवेळी कमाल तापमानामध्ये मोठा चढ-उतार होत आहे. संपूर्ण जानेवारी महिन्यात कमाल तापमानाने अनेक दिवसांत सरासरीची पातळी ओलांडली. सांताक्रूझ आणि पुलाबा येथील हवामान खात्याच्या मोजमाप पेंद्रांवर 32 ते 35 अंशांच्या आसपास कमाल तापमान नोंद झाले. मुंबई शहरात थंडीची लाट आणणाऱ्या उत्तरेकडील थंड वारे यंदाच्या जानेवारीत सक्रिय नव्हते. त्याजागी पूर्वेकडील कोरड्या वाऱ्यांची सक्रियता अधिक राहिली. त्यामुळे दिवसाच्या वातावरणात उष्णताच अधिक जाणवली. 3 जानेवारी रोजी तर कमाल तापमानाच्या पाऱ्याने कहर केला आणि थेट 36 अंशांची पातळी गाठली. हे कमाल तापमान 2016 नंतरचे सर्वाधिक तापमान होते. मुंबईप्रमाणेच संपूर्ण देशभरात जानेवारी उष्ण महिना ठरला. हवामान विभागातील तज्ञांच्या म्हणण्यानुसार, यंदाचा जानेवारी सन 1901 नंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा उष्ण जानेवारी महिना म्हणून नोंद झाला आहे.
पूर्वेकडील कोरड्या आणि शुष्क वाऱ्यांचा रात्रीच्या वातावरणावर काही प्रमाणात प्रभाव दिसून आला. सर्वसामान्यपणे मुंबई शहरात जानेवारीत 17.3 अंश इतके सरासरी किमान तापमान असते. यंदा त्यात किंचितशी वाढ झाली आणि महिनाभरात 18.5 अंश सरासरी किमान तापमानाची नोंद झाली. 9 जानेवारी रोजी मुंबईकरांना थंडीचा कडाका जाणवला. या दिवशी 13.7 अंशांपर्यंत तापमानात घट झाली.
फेब्रुवारी महिनाही घाम फोडणार
जानेवारीप्रमाणे फेब्रुवारीतही मुंबईकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. चालू महिन्यात तापमानात अचानक मोठी वाढ होऊ शकते. ’वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव कमी झाल्याने मुंबईच्या तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. आठवडाभरानंतर थंडीची तीव्रता कमी होण्याची चिन्हे आहेत.