हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा मुंबईतील झोपडीधारकांना चांगले जीवन जगता यावे यासाठी एसआरए योजना आणली. त्यानंतर राज्य सरकारनेही बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी पुनर्विकास योजना आणली, मात्र केंद्राच्या अखत्यारीतील शिवडीतील जमिनीवर असलेल्या बीडीडी चाळी, रेल्वे, बीपीटीच्या जमिनीवरील झोपड्यांचा पुनर्विकास केंद्राच्या मंजुरीअभावी रखडला आहे. मुंबई-गोवा महामार्ग अनेक वर्षे रखडला आहे. गोरेगावमध्ये मेट्रोसाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. पण राष्ट्रपतींच्या भाषणात या सगळय़ांचा साधा उल्लेखही नाही. सब का साथ, सब का विकास म्हणता मग केंद्राकडून मुंबई आणि महाराष्ट्रावर असा अन्याय का सुरू आहे, असा सवाल शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी केला.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर लोकसभेत बोलताना मुंबई आणि महाराष्ट्रावरील अन्यायाला वाचा फोडत अरविंद सावंत यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. पालघरमध्ये होणारे वाढवण बंदर विकसित करून आदिवासींना वेठीस धरण्याऐवजी मुंबई बंदराचा विकास करा. नितीन गडकरी यांनी मुंबई बंदराच्या विकासाचा प्लॅन बनवला होता, पण त्याचे पुढे काय झाले? मुंदरा बंदरासाठी मुंबई बंदराचा विकास रोखला आहे का? हा मुंबईकरांवर अन्याय आहे. मुंबईतील कामगारांसाठी सुरू करण्यात आलेले परळमधील महात्मा गांधी रुग्णालय चालत नाही. केंद्र सरकारने ही जागा ताब्यात घेऊन टाटा रुग्णालयाला द्यावी, केईएम रुग्णालयाला द्यावी, अशी मागणीही अरविंद सावंत यांनी केली.