Published on
:
03 Feb 2025, 11:36 pm
Updated on
:
03 Feb 2025, 11:36 pm
आगरतळा : आपल्या देशात असंख्य मंदिर आहेत. जागोजागी देवळं आहेत. देशातील रहस्यमय मंदिरे आणि त्यांशी संबंधित कथा आपल्याला अनेक वेळा ऐकायला मिळतात; परंतु आज आम्ही ज्या मंदिराबाबत सांगणार आहोत ते अत्यंत खास आहे. या खुल्या मंदिरात 99 लाख 99 हजार 999 मूर्ती आहेत. आता तुम्ही म्हणाल हे मंदिर कुठे आहे? कोणते मंदिर आहे? आणि इतक्या मूर्तींचे रहस्य काय आहे? हे मंदिर त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळापासून सुमारे 145 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराचं नाव आहे ‘उनाकोटी’. या मंदिरात एकूण 99 लाख 99 हजार 999 दगडांच्या मूर्ती आहेत आणि त्यांचे रहस्य आजपर्यंत कोणालाही उलगडता आलेले नाही. उदाहरणार्थ, या मूर्ती कोणत्या काळात आणि कोणत्या कारणासाठी बनविल्या आणि त्यातले सर्वात मोठे गूढ म्हणजे एक कोटीमध्ये एक मूर्ती कमी का आहे? ‘उनाकोटी’ या नावाचा अर्थ ‘कोटीमध्ये एक कमी’ असा आहे आणि याच मूर्त्यांच्या संख्येच्या कारणामुळे या स्थळाचे नाव ‘उनाकोटी’ पडले आहे.
उनाकोटीला रहस्यमय स्थळ मानले जातं कारण हे एक पर्वतीय क्षेत्र आहे, ज्यात घनदाट जंगलं आणि दलदलीची क्षेत्रं आहेत. अशा परिस्थितीत जंगलाच्यामध्ये लाखो मूर्ती कशा तयार केल्या गेल्या असाव्यात. कारण, या कामात अनेक वर्षे लागू शकतात आणि त्या भागात तेव्हा कोणताही रहिवासी नसावा, असंही सांगितलं जातं. हा एक दीर्घकाळापासून संशोधनाचा विषय बनला आहे; परंतु अद्याप ठोस उत्तर मिळालं नाही. या ठिकाणाबाबत काही पौराणिक कथाही सांगितल्या जात असतात. उनाकोटी मंदिर भारतातील सर्वात गूढ मंदिरांपैकी एक मानलं जातं आणि ते त्रिपुरा राज्याच्या आगरतळा शहरापासून 145 किलोमीटर दूर आहे.