महाकुंभातील चेंगराचेंगरीवरून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱया दिवशी आज दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारने सत्य सांगावे, मृतांचा आकडा लपवण्यात येत आहे, असा आरोप केला. लोकसभेत विरोधविरोधी पक्षाच्या खासदारांनी सातत्याने गदारोळ सुरूच ठेवत सभात्याग केला. मात्र, काही वेळाने सर्व खासदार परतले आणि अधिवेशन पुढे सुरू झाले. भानावर या , भानावर या… केंद्र सरकार भानावर या… अशी घोषणाबाजी विरोधकांनी सुरूच ठेवली.
ओम बिर्ला संतापले
लोकसभेत महाकुंभमधील चेंगराचेंगरीवरून प्रचंड गदारोळ झाल्याने अध्यक्ष ओम बिर्ला यांचा पारा चढला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात महाकुंभचा उल्लेख केला आहे. सध्या प्रश्नोत्तराचा तास आहे. इतकर कोणत्याही विषयावर चर्चा होऊ शकत नाही. जनतेने तुम्हाला संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पाठवले आहे. टेबल पह्डण्यासाठी नाही तुमचे प्रश्न मांडा, अशा शब्दांत बिर्ला यांनी खडसावले. त्यानंतरही विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवला, पेंद्र सरकारने भानावर यावे, योगी सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी लावून धरली. त्यानंतरही कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
चेंगराचेंगरीत हजारो लोकांचा मृत्यू- मल्लिकार्जुन खरगे
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या हजारो लोकांना माझी श्रद्धांजली असे म्हटले. याला आक्षेप घेत राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी निवेदन मागे घेण्यास सांगितले. परंतु, खरा आकडा सांगितल्यास माफी मागेन असे उत्तर खरगे यांनी दिले. आकडेवारी बरोबर नसेल तर सत्य काय ते सरकारने सांगावे. माझी चूक असेल तर मी माफी मागतो असे ते म्हणाले.
मृतदेह गंगेत फेकले- जया बच्चन
कुंभमेळ्याच्या वेळी गंगेत मृतदेह फेकले गेल्याचा आरोप समाजवादीच्या खासदार जया बच्चन यांनी केला. सध्या संपूर्ण देशात सर्वाधिक दूषित पाणी हे कुंभमेळ्यातील आहे असेही त्या म्हणाल्या. तसेच कुंभमेळ्यातील भाविकांची नेमकी आकडेवारी सादर करण्याची मागणीही त्यांनी केली.
दोन कोटी भाविकांचे अमृतस्नान
कुंभमेळ्यात आज वसंत पंचमीनिमित्त सायंकाळी 4 वाजेपर्यंत तब्बल 2 कोटी भाविकांनी अमृतस्नान केले. 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू तर 60 जण जखमी झाले होते. या घटनेतून धडा घेऊन आज सर्वत्र चोख बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.