अभिनेत्री पूजा हेगडे आणि शाहिद कपूर यांचा ‘देवा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. रोशन अँड्र्युज दिग्दर्शित हा चित्रपट 29 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत पूजाच्या संयमाचा बांध सुटला. पत्रकाराने सतत एकाच विषयावरून प्रश्न विचारल्याने पूजा त्याच्यावर भडकली. यावेळी तिच्या बाजूला बसलेला सहकलाकार शाहिद कपूरने परिस्थिती हाताळली आणि पूजाला शांत होण्यास सांगितलं. मोठ्या बॉलिवूड कलाकारांसोबत काम करायची संधी कशी मिळत गेली आणि यात नशिबाचा काही भाग होता का, याबद्दल पत्रकाराने पूजाला प्रश्न विचारला होता. पूजाने आतापर्यंत ‘किसी का भाई, किसी की जान’, ‘राधेश्याम’, ‘हाऊसफुल 4’, ‘मोहेंजोदारो’, ‘सर्कस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय.
“तू करिअरच्या सुरुवातीलाच सलमान खान, हृतिक रोशन, रणवीर सिंह, शाहिद कपूर यांसारख्या मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करतेय. हा तुझ्या नशिबाचा भाग आहे का? की तुझ्या कामामुळे या भूमिका मिळाल्या आहेत”, असा प्रश्न पूजाला विचारण्यात आला. त्यावर पूजा म्हणते, “अर्थातच माझ्या कामामुळे या भूमिका मिळाल्या आहेत. या चित्रपटांच्या ऑफर्स मला देण्यामागे नक्कीच काहीतरी कारणं असतील.” त्यावर पत्रकार तिला सांगतो की कशाप्रकारे दाक्षिणात्य चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये आलेल्या काही अभिनेत्रींना खूप संघर्ष करावा लागला. पण पूजाला मात्र मोठे चित्रपट आणि मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी सहज मिळाली.
हे सुद्धा वाचा
पत्रकाराच्या या दुसऱ्या प्रश्नावरही पूजा संयमाने उत्तर देते. “जेव्हा तयारी आणि संधी या दोन्ही गोष्ट एकत्र येतात तेव्हा नशीब आपोआप खुलतं, असं म्हटलं जातं. माझ्याबाबतीत असंच काहीसं घडत असावं. जेव्हा संधी मिळते, तेव्हा त्याचं सोनं करण्यासाठी मी खूप मेहनत करते. याला जर तुम्ही माझं नशीब म्हणत असाल, तर ठीक आहे,” असं पूजा म्हणते. यावरही समाधान न झाल्याने पत्रकार पूजाला पुन्हा विचारतो, “तू चित्रपटांची निवड कशी करतेस? मोठा हिरो पाहून की?” हे ऐकल्यावर मात्र पूजा चांगलीच चिडते. “तुम्हाला नेमका माझा काय प्रॉब्लेम आहे”, असं ती रागात विचारते.
परिस्थिती पाहून पूजाच्या बाजूला बसलेला शाहिद थोडीफार मस्करी करून वातावरण हलकंफुलकं करण्याचा प्रयत्न करतो. “मनातल्या मनात त्यालासुद्धा तुझ्यासोबत काम करायची, डान्स करायची इच्छा असेल. त्याला तुझ्यासोबत दिसायचं असेल”, असं तो म्हणतो. यानंतर सर्वजण हसू लागतात.