Published on
:
04 Feb 2025, 6:23 am
Updated on
:
04 Feb 2025, 6:23 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट विश्वातील 'विक्रमादित्य' अशी भारतीय संघाचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची ओळख आहे. त्याने आपल्या असामान्य कामगिरीने फलंदाजीतील अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केले. क्रिकेटमधील विक्रम आणि सचिन तेंडुलकर हे समीकरण झालं. त्याच्या निवृत्तीनंतर विराट कोहली (Virat Kohli) या भारताच्या स्टार फलंदाज त्याच्या विक्रमांचा पाठलाग करत आहे. आता इंग्लंडविरुद्ध ( IND vs ENG) सुरु होणार्या वन-डे (एकदिवसीय) मालिकेत सचिनचा मोठा विक्रम मोडण्याची संधी विराट कोहलीला असणारा आहे. जाणून घेवूया या विक्रमाविषयी...
तब्बल १९ वर्ष 'ताे' विक्रम अबाधित
वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १४ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. त्याने २००६ मध्ये ३५० व्या वन-डे सामन्यात ही कामगिरी केली होती. त्यावेळी सचिनने पेशावरमध्ये पाकिस्तानविरुद्ध झुंझार खेळी करत शतक झळकावले होते. आता विराट कोहलीकडे २८५ सामन्यातच हा असामान्य विक्रम मोडण्याचा विक्रम संधी विराट कोहलीला आहे. त्याने ही कामगिरी केली तर वन-डेमध्ये सर्वात जलद गतीने १४००० धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदला जाईल.
विराट कोहली @13906... नव्या विक्रमासाठी केवळ ९४ धावांची गरज
विराट कोहलीने आपल्या वन-डे कारकीर्दीत आतापर्यंत २८३ सामन्यांमध्ये ५८.१८ च्या सरासरी आणि ९३.५४च्या स्ट्राइक रेटने १३९०६ धावा केल्या आहेत. यामध्ये तब्बल ५० शतके आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. आता वन-डेमध्ये सर्वात जलद गतीने १४००० धावा पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ ९४ धावांची गरज आहे.
IND vs ENG : विराटसमोर असेल कमबॅकचे मोठे आव्हान
कोहली गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. मागील वर्षी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वन-डे मालिकेत कोहलीने तीन सामन्यात १९.३३ च्या सरासरीने केवळ ५८ धावा केल्या होत्या. त्याने या मालिकेतील तीन डावात अनुक्रमे २४,१४ आणि २० धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे वन-डे विश्वचषक २०२३ अंतिम सामन्यानंतर विराटने केवळ तीन वन-डे सामने खेळले आहेत. आता चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तो पुन्हा फॉर्म मिळवण्यासाठी उत्सुक असेल. पर्थ येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावले; पण मालिकेतील अन्य सामन्यांमध्ये त्याला पुन्हा संघर्ष करावा लागला. नुकताच तो १२ वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळला, पण तिथेही केवळ ६ धावांवर तो बाद झाला. आता इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत पुनरागमनाचे मोठे आव्हान विराट कोहली समोर असेल.
इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेस ६ फेब्रुवारीपासून होणार प्रारंभ
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची वन-डे मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होईल. पहिला सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. यानंतर, दोन्ही संघ कटक आणि अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुसरा आणि तिसरा सामना खेळतील. १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीच्या दृष्टीने इंग्लंडविरुद्धची वन-डे मालिका संघातील सर्वच खेळाडूंसाठी महत्त्वाची आहे.