मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी विष्णू चाटेबाबत धनंजय देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे. विष्णू चाटे याच्या मोबाईलमध्येच सर्व पुरावे आहेत. पोलिसांनी हा मोबाईल शोधून काढावा. त्यातील डेटा चेक करावा, तुम्हाला सर्व पुरावे सापडतील, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींची स्पेशल रिमांड घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचंही धनंजय यांनी स्पष्ट केलं आहे. धनंजय देशमुख मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
विष्णू चाटे या प्रकरणातील आरोपी आहे. त्याने त्याचा मोबाईल कुठे तरी टाकला आहे. त्यात संघटीत गुन्हेगारीचं जाळं कुठपर्यंत गेले त्याचे सर्व पुरावे आहेत. त्याच्यावर फक्त पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल न करता तो मोबाईल कसा रिकव्हर कसा होईल हे पाहिलं पाहिजे. नुसता मोबाईल सापडून फायदा नाही, त्यातील सर्व डाटा रिकव्हर झाला पाहिजे. याचे मूळ कुठपर्यंत गेलंय आणि शेवट कुठपर्यंत गेलाय हे मोबाईल सापडल्यावरच कळणार आहे, असं धनंजय देशमुख म्हणाले. तसेच आरोपींची वेगळी स्पेशल रिमांड घ्या, पुरावे आणि मोबाईल जनतेसमोर आणा आणि आम्हाला न्याय द्या, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
तर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ
सध्या सर्व गोष्टी सुरळीत सुरू आहेत. तपासही योग्य दिशेने सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटण्याचं ठरलेलं नाही. पण मुख्यमंत्र्यांचा निरोप आला किंवा सुरेश धस म्हणाले तर आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
त्यांना फाशीच द्या
माझी भूमिका स्पष्ट आहे, या खुणातील आरोपी आहेत त्याना फाशीची शिक्षा झाली पाहीजे. ज्याने आरोपींना पाठवलं, कार्यकर्ते ज्यांचे आहेत, ज्यांचे या लोकांशी संबंध आहेत, त्या सर्व आरोपींना फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
चौकशी झाली पाहिजे
अंजली दमानिया यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अंजली दमानिया यांनी आरोपाचे पुरावे दिले आहेत. त्या न्याय मागत आहेत, त्यामुळे दोषीवर कारवाई व्हावी. आम्ही आरोपीला फाशी द्या म्हणतोय. त्याचप्रमाणे अंजली दमानिया यांनी आरोप केले आहेत, त्याची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास करावा. सुरेश धस यांनी पुरावे दिले होते, त्यावर समिती नेमली. त्याचप्रमाणे अंजली दमानिया यांच्या आरोपांवर चौकशी व्हावी. हे प्रकरण नेमकं काय आहे, याची माहिती जनतेसमोर आली पाहिजे, असंही ते म्हणाले.
महंत शिवाजी महाराज भेटणार
दरम्यान, भगवान गडाचे महंत शिवाजी महाराज हे भेट घेण्यासाठी येणार असल्याची माहितीही धनंजय देशमुख यांनी दिली. परवा नारायण गडावर गेलो होतो. दर्शन घेतलं. महंत शिवाजी महाराजांशी तेव्हा फोनवर बोलणं झालं होतं. आज ते भेटायला येणार आहेत. त्यांचा तसा निरोप आला आहे. मी एक दोन दिवसात येणार आहे, असं ते मला बोलले होते. त्यानुसार ते येत आहेत, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.