Published on
:
04 Feb 2025, 10:31 am
Updated on
:
04 Feb 2025, 10:31 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: भाजप नेते राजीव चंद्रशेखर यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्याविरुद्ध दाखल केलेला फौजदारी मानहानीचा दावा दिल्ली न्यायालयाने मंगळवारी (दि.४) फेटाळून लावला. तसेच शशी थरूर यांना याबद्दल समन्स बजावण्यास देखील न्यायालयाने नकार दिल्याचे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.
दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टातील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पारस दलाल यांनी सुनावणीनंतर हा खटला फेटाळला आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, "शशी थरूर यांच्याविरोधातील तक्रारीत मानहानीचे कोणतेही घटक सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे समन्स बजावण्यात येत नाही".
भाजप नेते चंद्रशेखर यांनी थरूर यांच्यावर राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर खोटे आणि अपमानजनक भाष्य केल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी थरूर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तिरुवनंतपुरम मतदारसंघातील मतदारांना लाच दिल्याचा आरोप देखील केला होता. हे आरोप खोटे आहेत हे माहित असूनही चंद्रशेखर यांनी थरूर यांचे विधान त्यांनी प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणि निवडणूक निकालांवर प्रभाव पाडण्यासाठी केले होते असा दावा देखील केला.