महाराष्ट्रात 2014 ते 19 दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजप युती सरकार असो, या सरकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरु असून केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही तर संपूर्ण भाजप युती सरकारच भ्रष्ट आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजप युती सरकारचे मंत्रीमंडळ भ्रष्टाचारी, खुनी आहे, एका मंत्र्यांवर न बोलता सगळ्यांवरच बोलले पाहिजे. धनंजय मुंडे यांच्यावर जे गंभीर आरोप होत आहेत ते निश्चितच चिंताजनक आहेत पण हे सर्व भाजपच करत आहे, भाजपचाच आमदार खुलेआमपणे मुंडेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल दररोज करत आहे. पण मुख्यमंत्री काहीच कारवाई करत नाहीत. भारतीय जनता पक्ष, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस व मिंधे गट यांच्यातील अंतर्गत वादाचा हा परिणाम आहे का? काँग्रेस पक्षाला त्यांच्या अंतर्गत भांडणात पडायचे नाही. राज्यात जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, शेतकऱ्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, सोयाबीन, धान, कांदा उत्पादक शेतकरी बरबाद झाला आहे. सरकारने बांगलादेशी महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे दिले आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शिर्डीत कालच दोन हत्या करण्यात आल्या, महिला सुरक्षित नाहीत. परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी या आंबेडकरी विचाराच्या तरुणाची हत्या पोलीसांनी केली. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर करण्यात आला, ही सर्व गंभीर प्रकरणे सरकार लपवत आहे पण विरोधी पक्ष म्हणून या मुद्यांवर गप्प बसणार नाही, सरकारला या सर्वांची उत्तरे द्यावी लागतील.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात रेड्याची शिंगे पुरल्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकार देशात आल्यापासून मांत्रिक व्यवस्था देशात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्या मांत्रिक व्यवस्थेच्या माध्यमातून या गोष्टी घडत आहेत आणि तोच प्रकार राज्यात आला आहे का? नरेंद्र मोदी सारखे आपणही पुढे येऊ म्हणून त्यांनी काही केले असेल आणि हे फडणवीसांना कळले असेल म्हणून ते वर्षा वर रहायला जात नाहीत का? माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायदा केला आणि तो कायदा असताना असे प्रकार घडत असतील तर लाजिरवाणी बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात असे प्रकार होत असतील गंभीर आहे, असेही पटोले म्हणाले.
विधानसभा निवडणुकीतील मतदानाबद्दल अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जे मुद्दे उपस्थित केले तेच मुद्दे काँग्रेस व मविआने आधीच उपस्थित केले आहेत. या प्रश्नी काँग्रेस पक्षाने निवणूक आयोगाकडे तक्रारही केलेली आहे. निवडणूक आयोगाने लोकशाहीचा खून केला आहे. प्रकाश आंबेडकर याच प्रश्नी कोर्टात गेले असतील पण राहुल गांधी यांनीही लोकसभेत काल हीच भूमिका मांडली. आता हे प्रकरण न्यायालयाकडे गेलेले आहे, यातून न्याय मिळेल अशी अपेक्षा करू असेही पटोले म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांचा बंदोबस्त करा!
भाजप युती सरकारच्या काळात महापुरुषांचा सातत्याने अपमान केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान हे सरकार पाहत आहे हे दुर्दैवी आहे. सरकारच जर महापुरुषांचा अपमान करु लागले तर राहुल सोलापुरकरसारखे लोकही त्याच पद्धतीने सरकारच्या मागे भुंकत असतात. सरकारच्या मानसिकतेचा परिणाम लोकांवरही झाला आहे, म्हणूनच ते महापुरुषांचा अपमान करण्याची हिम्मत करु शकतात. कलाकार असला म्हणजे त्याला काय वेगळी शिंगं नाही फुटत, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्याला पायबंद घातलाच पाहिजे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.