Published on
:
04 Feb 2025, 2:28 pm
Updated on
:
04 Feb 2025, 2:28 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. अहवालानुसार, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे तो 6 फेब्रुवारीपासून सुरू होणा-या मालिकेत खेळताना दिसणार नाही. मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी बुमराहची संघात निवड झाली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाली होती. तो सध्या बेंगळुरूमधील एनसीएमध्ये तज्ञांच्या देखरेखेखाली आहे. तो अगामी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये मैदानात उतरणे कठीण असल्याचे समोर आले आहे. परंतु शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी बुमराह तंदुरुस्त होईल अशी शक्यता होती. मात्र, तसे झालेले नाही. नवीन अपडेटनुसार भारतीय चाहत्यांना धक्का बसला आहे. बुमराह इंग्लंडविरुद्धच्या तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणेही कठीण
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराह खेळणे आता कठीण मानले जात आहे. सोमवारी बुमराहबाबत एक अहवाल आला. अहवालात असे सांगण्यात आले आहे की बुमराह बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये आहे आणि त्याची फिटनेस चाचणी येथे घेतली जाईल. तो सध्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली राहील.
बुमराह 2-3 दिवस एनसीए तज्ञांच्या निरीक्षणाखाली असेल. संपूर्ण चौकशीनंतरच हा अहवाल अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीकडे पाठवला जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी संघात बुमराहला कायम ठेवायचे की नाही हे ठरवण्यासाठी भारतीय संघाकडे फक्त एक आठवडा शिल्लक आहे. आयसीसीच्या अंतिम मुदतीनुसार, सर्व संघांना त्यांच्या संघात बदल करण्यासाठी 12 फेब्रुवारीपर्यंत वेळ आहे. अशा परिस्थितीत, टीम इंडियाकडे बुमराहबाबत निर्णय घेण्यासाठी आता फक्त एक आठवडा आहे.